शहरात २०१४-१५ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने आतापासूनच जादा रेल्वे गाडय़ांचे नियोजन करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रवासी संघटनेने निवेदनाव्दारे रेल्वे खात्याकडे केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी या संदर्भात निवेदन पाठविले आहे. आगामी सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर शहरात देशातील विविध भागांतून लाखो भाविक, साधू-महंत कुंभमेळ्याची पर्वणी साधण्यासाठी येणार आहेत. या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जादा रेल्वे गाडय़ांचे नियोजन करण्यात यावे तसेच नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, फलाटांची संख्या सहापर्यंत वाढविणे, या कामांना आतापर्यंत सुरुवात होणे आवश्यक होते. रेल्वे टर्मिनसचे काम त्वरित सुरू करावे, मुंबई-नाशिक कुसुमाग्रज एक्स्प्रेस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावी, भाविकांसह पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस, नाशिकरोड येथून मनमाडमार्गे नांदेड व सोलापूरकरिता जलद पॅसेंजर गाडी सुरू करावी, अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
भुसावळ ते मुंबईकरिता जनशताब्दी ही जलद एक्स्प्रेस गाडी सुरू केल्यास नाशिक व भुसावळच्या प्रवाशांना कमी कालावधीत राजधानी दिल्लीला जाता येणे शक्य होणार आहे.
२०१३-१४च्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे खात्याकडून मान्यता दिलेल्या मनमाड ते इंदूर, नाशिक जव्हार मार्गे डहाणू रोड, पुणे, नाशिक, सुरत या ४७० किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचे काम कोकण रेल्वेच्या धर्तीवर करण्यात यावे, असेही बुरड यांनी सुचविले आहे.
कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्व मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना चार सर्वसाधारण श्रेणीचे डबे वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील खासदार व आमदार, मंत्री, यांसह इतर लोकप्रतिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणीही प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.