येत्या १० डिसेंबरपासून नागपूरला सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच शिवसेनाप्रमुखांच्या आजवरच्या दबदब्याची अनुपस्थिती जाणवणार आहे. शिवसेनेच्या आमदारांचा मार्गदर्शक आधारवडच कोसळल्याने यंदाच्या अधिवेशनात आम्हाला पोरके झाल्यासारखे वाटेल. परंतु, आमची जबाबदारी आता अधिकच वाढली आहे, अशी भावना शिवसेनेच्या आमदारांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
शिवसेनेने सत्तेचे राजकारण केले असले तरी शिवसेनाप्रमुख कधीच सरकारी पदांवर राहिले नाहीत. कधीही लाल दिव्याच्या गाडीतून फिरले नाहीत. सरकारी पदाचा कधीही लोभ ठेवणार नाही, हा शब्द त्यांनी आयुष्यभर पाळला. त्यामुळे शिवसेनेच्या वर्तुळात त्यांचा शब्द प्रमाण होता. १९९५ साली महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तेव्हा सेनाप्रमुखांनी मनोहर जोशी आणि त्यानंतर नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. मनोहर जोशींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात एक मुद्दय़ावरून सेनाप्रमुखांच्या संतापाचा स्फोट झाला आणि युती सरकार अक्षरश: गदागदा हलले होते. एवढा त्यांच्या संतापाचा दबदबा होता. युती सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याचे ते जाहीरपणे सांगायचे. यात त्यांनी लपवाछपवी केली नव्हती.
शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यापासून २०११ पर्यंतच्या काळात जेवढी काही हिवाळी अधिवेशने नागपुरात झाली त्या त्या वेळी बाळासाहेबांनी मुंबईतील ‘मातोश्री’वरून शिवसेना आमदारांना आपल्या आदेशात बांधील ठेवले. परंतु, या आदेशात जनतेची कामे मागे ठेवू नका, जनतेसाठीच काम करा, असे सांगणे असायचे, अशी आठवण रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी सांगितली. सेना आमदार ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहे त्या मतदारसंघातील समस्यांची त्यांना जाण असायची. वृत्तपत्रांच्या नियमित वाचनातून त्यांना राज्यभरातील मतदारसंघांच्या समस्या अवगत व्हायच्या. त्यावेळी बंगल्यावरून साहेबांचा दूरध्वनी यायचा आणि संबंधित आमदाराला ते लक्ष घालण्याचा आदेश द्यायचे, असे जयस्वाल म्हणाले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाणे सर्वच आमदारांना जड जाणार आहे. काहीही होवो आपला बाप आपल्या पाठीशी आहे, ही भावना सर्वसामान्य शिवसैनिकांपासून ते आमदार, खासदारांपर्यंत होती. बाळासाहेब ठाकरे अधिवेशनापूर्वी आमदारांचा वर्ग घ्यायचे, त्यात कोणत्याही प्रकाराचे राजकीय डावपेचाचे मुद्दे नसायचे. सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, जशास तसे उत्तर द्या, सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडा, असाच त्यांचा आदेश असायचा. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी आपली बांधीलकी आहे, जे चुकीचे आहे, ते चुकीचे म्हणून सांगा आणि बरोबर असेल, तर योग्य म्हणा. असाच त्यांचा संदेश असायचा. आम्हा आमदारांना त्यांची कधीच भीती वाटली नव्हती, अधिवेशन काळात आक्रमकपणे बाजू मांडली म्हणून दोन वेळा निलंबित व्हावे लागले, ही आक्रमकता त्यांनीच आम्हाला शिकवली, विधिमंडळ अधिवेशनासाठी शिवसेनेची भूमिका ही नेहमीप्रमाणेच सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस नेण्याची राहणार आहे. शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, आम्ही कुणाला घाबरणार नाही, हे पुन्हा सिद्ध करू, असे दर्यापूरचे शिवसेना आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी सांगितले.
नागपूरचे सर्वात गाजलेले हिवाळी अधिवेशन १९९१ सालचे होते. छगन भुजबळ यांच्यासह एक तृतीयांश आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने बाळासाहेब प्रचंड अस्वस्थ होते. शिवसैनिकही प्रचंड संतापलेले होते. विश्वासू सरदाराने पाठीत खंजीर खुपसल्याची सल सेनाप्रमुखांच्या मनात कित्येक वर्षे कायम होती. तेव्हापासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काय घडामोडी घडत आहेत, याचा वेळोवेळी अदमास शिवसेनाप्रमुख घेत असत, असेही अडसूळ यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
हिवाळी अधिवेशनात जाणवणार सुनेपणा..
येत्या १० डिसेंबरपासून नागपूरला सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच शिवसेनाप्रमुखांच्या आजवरच्या दबदब्याची अनुपस्थिती जाणवणार आहे. शिवसेनेच्या आमदारांचा मार्गदर्शक आधारवडच कोसळल्याने यंदाच्या अधिवेशनात आम्हाला पोरके झाल्यासारखे वाटेल.

First published on: 20-11-2012 at 04:30 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There should be silentness in winter session says shivsena mla