भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांनी केले. अमरावतीच्या श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११४व्या जयंतीनिमित्त धनवटे नॅशनल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे याप्रसंगी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
आदर्श माणूस घडविणारे तसेच तरुण पिढीला प्रेरणादायी असे व्यक्तिमत्त्व भाऊसाहेबांचे होते. त्यांचे विचार प्रेरणादायी व लोकाभिमुख आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये सर्वसमावेशक तत्त्वांचा विचार होता. शैक्षणिक, सामाजिक कृती करताना या तत्त्वांचा अवलंब करण्याची गरज आहे, असे सिरपूरकर म्हणाले. सत्य व मानवता यांचे महत्त्व विशद करीत त्यांनी न्यायाची व्याख्या सांगितली. डॉ. शरद निंबाळकर म्हणाले, वाचन व व्यासंग जोपासल्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. व्यासंग व वाचन केल्यानेच महापुरुष घडले. भाऊसाहेबांचे विचार अंमलात आणले असते तर एकाही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली नसती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर एक आदर्श ठेवावा. महापुरुषांच्या चारित्र्याचा अभ्यास करून त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करून व्यक्तिमत्त्व घडविणे, हीच भाऊसाहेबांना आदरांजली ठरेल, असे डॉ. तायवाडे म्हणाले. भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी, पुष्परचना, मेहंदी, वक्तृत्व, वादविवाद, एकांकिका, गायन, भित्तीपत्र, घोषवाक्य, हस्ताक्षर आदी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्घामधील यशस्वी तसेच खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रास्ताविक डॉ. पी. एस. चंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. भारती खापेकर यांनी तर डॉ. कल्पना देशमुख यांनी आभार मानले.