अनेक भाविकांची नाराजी
खासगी वाहनांना करण्यात आलेला प्रतिबंध आणि पावसाने दिलेली ओढ यांचा परिणाम यंदा तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या प्रदक्षिणेवर झाल्याचे स्पष्ट झाले. या दिवशी दुपापर्यंत भाविकांचा ओघ कायम असला तरी भाविकांची संख्या सुमारे अडीच लाखापर्यंत मर्यादित राहिली. रविवारी मध्यरात्री ‘ब्रम्हगिरी’ला प्रदक्षिणा मारण्यासाठी चढाई करणाऱ्या भाविकांची सोमवारी सकाळपासून परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली. राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी तब्बल ५०० बसेसचा ताफा सज्ज ठेवून अविरत फेऱ्या मारत लाखो रूपयांचे उत्पन्न कमाविले. खासगी वाहतुकीला पूर्णत: अटकाव घालत पोलिसांनी त्र्यंबकेश्वरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला. मोफत खानपान देण्यासाठी सरसावलेले लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी आपल्या उपक्रमाचा डीजेच्या दणदणाटात डंका पिटल्याने त्र्यंबक नगरीला कर्णकर्कश गोंगाटाला सामोरे जावे लागले.
श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे, त्र्यंबकेश्वरात लाखो भाविकांची मांदीयाळी हे समीकरण तसे रूढ झालेले. या दिवशी ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी तीन ते पाच लाखापर्यंत भाविक दरवर्षी येथे दाखल होतात. यंदा मात्र, भाविकांची संख्या नेहमीच्या तुलनेत काहिशी कमी झाल्याचे दिसून आले. पोलीस यंत्रणेने प्रदक्षिणा मार्गासह मंदिर व एकूणच त्र्यंबक नगरीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खासगी वाहनांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन यंदा या कालावधीत हा मार्ग खासगी वाहनांसाठी बंद करण्यात आला. त्याकरिता जवळपास ठिकठिकाणी अडथळ्यांद्वारे रस्ते बंद करून खासगी वाहने या मार्गावर येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली. खासगी वाहनांना प्रवेशबंदी असल्याने भाविकांना नाशिकहून त्र्यंबकेश्वरला ने-आण करण्याची जबाबदारी राज्य परिवहन महामंडळाने नेटाने पार पाडली. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे सुमारे ५०० बसेस सोडण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक कैलास देशमुख यांनी दिली. गतवेळी बसेसची संख्या कमी असल्याने भाविक टपावर बसून प्रवास करत होते. यामुळे यंदा मुबलक बसेस सोडून कोणालाही असा प्रवास करावा लागणार नसल्याची दक्षता घेतली गेली. मेळा स्थानकावर भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून नाशिकरोडहून ३५, निमाणी बसस्थानक ४०, सातपूरहून १० बसेस सोडण्यात आल्या. या माध्यमातून लाखो प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.
रविवारी मध्यरात्री ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेला ‘बम् बम् भोले’च्या गजरात सुरूवात करणारे हजारो भाविक सोमवारी पहाटे त्र्यंबकेश्वरात दाखल झाले. या दिवशी पाऊस नसला तरी प्रदक्षिणा मार्गावर सर्वत्र चिखल आहे. त्यामुळे चालणे अवघड ठरले. प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या थकलेल्या व आजारी भाविकांना सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रुग्णालयात पोहोचविण्याचे काम केले. फेरीमार्गावर भाविकांना चहा, नाश्ता, फराळाचे पदार्थ व फळे मोफत देण्यासाठी नाशिकचे काही नगरसेवक, सामाजिक संस्था व मंडळांची अहंमहिका सुरू होती. भलामोठा फलक लावून डीजेच्या दणदणाटात या पदार्थाचे वितरण केले जात होते. यामुळे ब्रम्हगिरीच्या परिसरात कमालीचा गोंगाट होता. प्लास्टिक, कागदी द्रोण व थाळी अस्ताव्यस्त फेकल्या जात असल्याने सर्वत्र कचऱ्याचा खच पसरला. प्रदक्षिणेसाठी निघताना घुमणारा ‘बम् बम् भोले’चा गजर कायम असला तरी परतताना भाविकांचा थकवा स्पष्टपणे जाणवत होता.