कार्यकर्त्यांनी कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवीत असतानाच मार्क्‍सवादी पक्षाचा विचारदेखील त्यांच्यात रुजविला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार जे. पी. गावित यांनी केले. शहरातील अशोकनगरात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
रेशन कार्डापासून ते कोणतीही कठीण समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला हे पक्ष कार्यालय आपले वाटले पाहिजे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधावा, असा सल्ला या वेळी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य डी. एल. कराड यांनी दिला. अध्यक्षस्थानी कॉ. सीताराम ठोंबरे होते. डॉ. अजित नवले यांचेही भाषण झाले.
सर्व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतानंतर सहा बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५०० रुपये तसेच पाच हजार रुपयांचे बांधकाम कामगारांना विविध योजनांसाठी देणे असलेल्या पाच हजार रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. सभेत श्रीधर देशपांडे, डॉ. अनिल नवले, तानाजी जायभावे, सचिन भोर, सिंधू शार्दुल, अशोक लहाने, वामन सोनवणे आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर व्यंकट कांबळे, कल्पना शिंदे, संदीप आहेर, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. अ‍ॅड. वसुधा कराड यांनी प्रास्ताविक केले.
संजय पवार यांनी सूत्रसंचालन केले. सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता चिखलीकर यास सापळ्यात पकडून देणारे इरफान शेख यांचा या सभेत सत्कार करण्यात आला.