तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर शहर गजबजू लागले असून राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपराजधानीत दाखल होत आहेत. रविभवन, रामगिरी, देवगिरी, आमदार निवास, सचिवालय परिसर, विभागीय आयुक्त, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरात शासकीय वाहनांची वर्दळही वाढली आहे.
एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. शहरातील विविध भागात मंत्र्यांच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्षांचे पोस्टर्स, होर्डिग लावण्यासाठी कार्यकर्त्यांंची धडपड सुरू आहे. विेशेषत वर्धा मार्गावर आणि विधिमंडळ परिसरात काही विशिष्ट जागा मिळविण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी महापालिकेकडे अर्ज केले आहेत.
जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर्स शहरातील विविध भागात झळकत आहेत. त्यामुळे शहरात ‘पोस्टर्स युद्ध’ जाणवत आहे. विधिमंडळ परिसरात ठिकठिकाणी कठडे बांधण्याचे काम सुरू आहे. अधिवेशन काळात सर्वाधिक मोर्चे यशवंत स्टेडियम येथून निघणार आहेत. सीताबडीवरील झिरो माईलजवळ मोर्चे रोखण्यात येणार असल्यामुळे त्या भागातही कठडे बांधले जात आहेत.
अधिवेशन काळात या भागातील वाहतूक बंद केली जाणार आहे. सुरक्षेसोबतच शहराच्या सौदर्यीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील अनेक रस्त्याचे डांबरीकरण, तर काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. रस्ते दुभाजकांना पिवळा व काळा रंग लावला जात आहे. झाडांना नित्यनेमाने पाणी देणे सुरू असून फुलझाडांची देखरेख, दिवसातून दोन वेळा वर्धा मार्गावरील रस्त्यांवरची साफसफाई, सिव्हील लाईन भागातील रस्त्यांची डागडुजी आणि स्वच्छता, बंद सिग्नल्स दुरुस्त केले जात आहेत. मंत्र्यांच्या गाडय़ांचा सामान्य लोकांना त्रास होऊ नये यासाठी पोलीस विभाग त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्थेची तयारी करीत आहे.
जिल्हाधिकारी व सचिवालय परिसरात अधिकाऱ्यांची ने-आण करण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्य़ांतून सुमारे दोन हजार गाडय़ा मागविण्यात आल्या असून त्यातील सुमारे १२०० गाडय़ा नागपुरात पोहोचल्याही आहेत. नागपूरबाहेरून अधिकाऱ्यांसाठी विविध विभागाच्या गाडय़ा मागविण्यात आल्यामुळे गाडय़ाची संख्या सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, सचिवालय, रविभवन, आमदार निवास या भागात मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे.
एलआयसी व रिझव्‍‌र्ह चौक क्वार्टर परिसरात आंदोलन करण्यासाठी मंडप उभारण्यात येत आहेत. अधिवेशन काळात वर्षांनुवर्ष मागण्या मान्य होत नसल्यामुळे अनेकजण आत्मदहन आणि आत्महत्या करण्याचा इशारा देतात त्यासाठी पोलीस दल सतर्क आहे. शहरात ठिकठिकाणी पोलिसांची गस्त सुरू आहे. रेल्वे स्थानक आणि विमानतळावरून अधिकाऱ्यांना आण्ण्यासाठी वाहनांची गर्दी दिसून
येत आहे.     
अधिवेशनाानिमित्त मंत्र्यांची, आमदारांची आणि अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था रविभवन, नागभवन, आमदार निवास, १६० खोल्यांचे गाळे या ठिकाणी करण्यात आली असली तरी शहरातील सर्व हॉटेल्स बुक झाले आहेत. अधिवेशन काळात शहरातील बहुतेक पंचतारांकित हॉटेलही बुक झाल्याची माहिती मिळाली आहे. मनसेने सिव्हील लाईन भागातील हॉटेल हेरिटेज, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तुली इंटरनॅशनल, तुली इम्पिरियल आणि सेंटर पॉईंट, तर भाजपने हॉटेल प्राईड आणि हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट या ठिकाणी व्यवस्था केली आली असल्याची माहिती मिळाली. या संदर्भात हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये चौकशी केली असता ९ ते २२ डिसेंबर या काळात हॉटेलमधील पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील सर्व खोल्यांचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले.