कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत साथीच्या रोगांचा मोठय़ा प्रमाणावर फैलाव झाला असून हिवतापाने आजारी असलेल्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. चाळी तसेच झोपडपट्टय़ांमध्ये साथीच्या आजाराचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे दिसून येत आहे. खासगी दवाखाने, रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. महापालिकेतील आरोग्य विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिवताप, कावीळ तसेच इतर साथीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा शेकडोंच्या घरात पोहचला आहे.   
पालिका हद्दीत गेल्या महिनाभरात अतिसाराचे ४५ रुग्ण, गॅस्ट्रोचे ३९, कावीळ ७०, मलेरिया ११८, विषमज्वर २००, तसेच डेंग्यूसदृश तापाने आजारी असलेले ३५ रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील सर्वच परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तीन ते चार दिवसांनंतर कचरा उचलला जात असल्याने कचराकुंडय़ांमधील घाण सर्वत्र पसरली असून या दरुगधीमुळे  नागरिक हैराण झाले आहेत. डोंबिवलीत विष्णूनगर पोलीस ठाण्यासमोरील मासळी बाजाराजवळील कचराकुंडीतील कचऱ्यामुळे या परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. शहराच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे ढीग पडल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचे हे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयाजवळील भोईरवाडी भागातील एका खासगी रुग्णालयात हिवतापावर उपचार घेत असलेला अरबाक मिर्झा (१५) हा तरुण गुरुवारी मरण पावला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अरबाकचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत मलेरिया रुग्णाचा हा तिसरा बळी गेला आहे. अरबाकला मलेरिया झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.