पूर्व मेळघाट वनविभागातील अंजनगाव परिक्षेत्रात कुंडी परिसरात एका वाघाचा मृतदेह नाल्याच्या काठावर खड्डा करून लपवून ठेवण्यात आल्याचे प्रकरण बुधवारी निदर्शनास आल्यानंतर वाघांच्या शिकारीच्या अनेक प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या वनविभागासमोर आता नवे आव्हान उभे ठाकले आहे. प्रथमदर्शनी वाघाच्या कातडी किंवा अवयवयांसाठी करण्यात आलेली ही शिकार नाही, हे सिद्ध झाले असून वाघाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी जेव्हा तपास सुरू करण्यात आला तेव्हा घटनास्थळाजवळच शेती करणाऱ्या शेतकऱ्याला वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसल्याचे त्याने सांगितले. भीतीपोटी नाल्याच्या जवळ खड्डा करून वाघाचा मृतदेह पुरल्याची कबुली या शेतकऱ्याने दिल्याची माहिती पूर्व मेळघाटचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.
बुधवारी पूर्व मेळघाट वनविभागातील कर्मचारी टेंब्रूसोडा वर्तुळातील अंबापाटी परिसरात गस्त करीत असताना कुंडी सव्‍‌र्हे क्रमांक १मध्ये नाल्याच्या काठावर त्यांना वन्यप्राण्याच्या मृतदेहाची दरुगधी आली. त्यांनी शोध सुरू केला तेव्हा नाल्याच्या पात्रातच एका ठिकाणी लहान खड्डय़ात माती आणि पालापाचोळ्याने झाकलेल्या अवस्थेत वाघाचा कुजलेला मृतदेह आढळला. या ठिकाणची अधिक तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने आखून दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे पशुचिकित्सा अधिकाऱ्यांचा चमू, मुख्य वन्यजीव रक्षकांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या एका प्रतिनिधीला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मुख्य वनसंरक्षक मोहन झा यांच्यासह वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाघाचा मृतदेह खड्डय़ाबाहेर काढल्यानंतर हाडांचा संपूर्ण सापळा, कुजलेल्या अवस्थेतील कातडी आणि इतर अवयव आढळून आले. यावरून प्रथमदर्शनी शिकारीसाठी या वाघाची हत्या करण्यात आलेली नाही, हे स्पष्ट झाले, असे जितेंद्र रामगावकर यांचे म्हणणे आहे.
गेल्या १९ सप्टेंबरला एका वृद्ध गुराख्यावर वाघाने हल्ला केल्यावर या वृद्धासोबतच वाघही जखमी झाला होता, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. घटनास्थळाजवळच शेती करणाऱ्या शेतकऱ्याने वाघाच्या मृत्यूप्रकरणात आपल्याला अडकले जाऊ, या भीतीने वाघाचा मृतदेह लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण वन कर्मचाऱ्यांच्या गस्तीमुळे हे प्रकरण निदर्शनास आले. या प्रकरणात इतर गावकऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असून वाघाच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी पुढील तापस कार्य वेगाने सुरू असल्याचे रामगावकर यांनी सांगितले.
मेळघाटात वाघांच्या शिकारीच्या प्रकरणात देशपातळीवर व्यापार करणाऱ्या तस्करांची चौकशी सध्या वनविभागामार्फत सुरू आहे. शिकाऱ्यांचा सूत्रधार सरजू बावरिया याला चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे प्रयत्न अमरावती वनविभागाने सुरू केले असतानाच आता हे नवे प्रकरण उद्भवल्याने वनविभागावरचा ताण वाढला आहे.