स्वर्गीय डॉ. द. शि. एरम कृतज्ञता सन्मान पुरस्कार हा माझ्या जीवनातील आनंदाचा परमोच्च क्षण असून, तो आपल्या माणसांनी दिल्याने या पुरस्काराची उंची माझ्या दृष्टीने खूप मोठी आहे. डॉ. द. शि. एरम यांचे व्यक्तिमत्त्व बावनकशी होते. त्यांनी कराड अर्बन बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या सोबत काम करता आले हा मी माझा सन्मान समजत असल्याचे समाधान येथील प्रतिथयश डॉ. कमल हावले यांनी व्यक्त केले.
कराड अर्बन सामाजिक कृतज्ञता न्यासातर्फे देण्यात येणारा स्वर्गीय डॉ. द. शि. एरम कृतज्ञता सन्मान पुरस्कार डॉ. कमल हावले यांना श्रीमती शीलाताई एरम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, महालक्ष्मी प्रतिमा असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, माजी खासदार श्रीनिवास पाटील, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष डॉ. राजीव अहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, रश्मी एरम यांच्यासह अर्बन कुटुंबातील सदस्य, हितचिंतक व सेवकवर्गाची उपस्थिती होती.
सुभाषराव जोशी म्हणाले की, डॉ. द. शि. एरम यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला असून, त्यांच्यासमवेत काम केले त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. सहकार क्षेत्रात घटना दुरुस्तीमुळे सहकार क्षेत्रातील बँकांच्या कार्यपध्दतीत आमूलाग्र बदल होणार आहेत. त्यामुळे यापुढे अधिक जबाबदारीने कामकाज करावे लागणार आहे. बँकेने नेहमीच वीस टक्क्यापेक्षा अधिक वाढ कायम ठेवली असून, यापुढे वाढीबरोबर प्रतिमेचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
श्रीनिवास पाटील म्हणाले की, कराड अर्बन बँकेने समाजात विश्वास निर्माण केला असल्याने बँक सर्वाना आपली वाटते. बँकेच्या प्रगतीच्या सर्व स्थित्यंतराचा मी साक्षीदार आहे. बँकेने सामाजिक कार्याद्वारे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, यापुढील काळातही बँकेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहील.
यावेळी मानपत्राचे वाचन बँकेचे उपाध्यक्ष डॉ. राजीव अहिरे यांनी केले, तर बँकेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पध्रेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच निवृत्त सेवकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रसंगी एकांकिका स्पध्रेचे परीक्षक देवेंद्र देव, स्पर्धक संस्था प्रतिनिधी प्रफुल्ल कोंदे व निवृत्त सेवक विलास भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, तर आभार अर्बन बझारचे अध्यक्ष विद्याधर गोखले यांनी मानले.