धरण-कालवे क्षेत्रात विंधन विहिरींबाबत प्रस्ताव
तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यास घेतल्या जाणाऱ्या सरकारी विंधन विहिरींच्या अयशस्वितेचे प्रमाण अधिक असल्याने टँकर भरण्यासाठी काही कूपनलिका ५०० मीटर खोलीपर्यंत घेण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी विनंती विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी वरिष्ठांकडे केली आहे. तसेच चाऱ्यासह तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना, धरणे व कालव्याच्या क्षेत्रात विंधन विहिरी घेण्यास मान्यतेबाबतचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत.
पाण्याचा एखादा स्रोत आटला, की पर्यायी स्रोत कोठे उपलब्ध आहे याचे नियोजन मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्हय़ाने तयार केले आहे. पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे, तेथे पाण्याचे पर्यायी साठे कोठे उपलब्ध आहेत, कोठे विंधन विहिरी घेता येऊ शकतील, याचे नियोजन प्रशासनाकडे एका ‘क्लिक’वर उपलब्ध आहे. पर्यायी पाणीसाठय़ांच्या माहितीचे नकाशे ‘डिजिटल’ स्वरूपात अधिकाऱ्यांकडे असल्याने पाणी भरण्यास टँकर कोणत्या मार्गाने जाईल, त्यासाठी किती वेळ लागेल, त्या भागात भारनियमन आहे की नाही, टँकर फेऱ्या योग्य होत नसतील तर कारणे काय, ही सर्व माहिती संगणकीकृत असल्याने बऱ्याच अडचणी कमी झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पाणीपुरवठय़ाच्या तात्पुरत्या योजनांसाठी निकष बदलण्याची गरज होती. त्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जालना व उस्मानाबादच्या योजनांची प्रशासनाने जाणीवपूर्वक पाठराखण केली.
वास्तविक, या दोन्ही योजना कंत्राटदार चालविणार असल्याने ‘वेंडर ड्रीवन स्कीम’ला प्रशासनाने किती पाठबळ द्यावे, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे केले नाहीतर पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाढेल आणि गावेच्या गावे स्थलांतरित करावे लागतील, असे अहवाल दिले. परिणामी, जालना व उस्मानाबादसाठी निधी मंजूर झाला. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी काही विशेष प्रयत्नही केले. परिणामी, टंचाईची तीव्रता काही प्रमाणात का असेना कमी करता आली, असा दावा केला जात आहे.
‘बाबूगिरी’ची मानसिकता कमी
प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर नेहमीच टीका केली जाते. मात्र, त्यांच्याकडून होणाऱ्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याची गरज असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीच म्हटले आहे. त्यामुळे अलीकडच्या दोन आठवडय़ांत ‘बाबूगिरी’ची मानसिकता काहीअंशाने का असेना कमी झाली आहे. येत्या काही दिवसांत उस्मानाबाद शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा होण्याची शक्यता वाढल्याने उस्मानाबाद जिल्हय़ातील टँकर कमी होतील, असा दावा केला जात आहे. मात्र, अंतर्गत जलवाहिनी समस्या बनल्याने पाणी आले तरी टँकर लागतीलच, असेही सांगितले जाते. जालन्यात मात्र बहुतांश भागात टँकरनेच पाणीपुरवठा करावा लागणार आहे. आष्टी व पाटोदा तालुक्यांतील काही गावांना कुकडी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. तो कधी होईल, हे मात्र अजून ठरले नाही.