शरद पवारांच्या आजच्या कोल्हापूर दौ-यायाकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीची समीकरणे, महायुतीच्या महासभेत उपस्थित केलेल्या मुद्यांचे प्रत्युत्तर, साखर उद्योगाचे बिघडलेले अर्थकारण, बेरजेचे राजकारण अशा विविध विषयांसंबंधी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शनिवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यात कोणते मत व्यक्त करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

लोकसभा निवडणुकीची समीकरणे, महायुतीच्या महासभेत उपस्थित केलेल्या मुद्यांचे प्रत्युत्तर, साखर उद्योगाचे बिघडलेले अर्थकारण, बेरजेचे राजकारण अशा विविध विषयांसंबंधी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शनिवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यात कोणते मत व्यक्त करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेचा इन्कार पवार यांनी ट्वीटरवरून केला असला तरी जाहीर कार्यक्रमात यासंदर्भात त्यांच्याकडून व्यक्त होणारी भूमिका ही त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीचे निदर्शक मानली जात असल्याने, ते याबाबत निश्चित काय बोलतात हेही लक्षवेधी ठरले आहे. शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांचा पाडाव करण्यासाठी साखरसम्राटांच्या एकीची साखरपेरणी पवारांकडून होण्याची चिन्हेही आहेत. सहा महिन्यांच्या अवधीनंतर पवार यांचे कोल्हापूर व सीमाभागात दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले असून, तेथील त्यांच्या विधानांकडे राजकीय निरीक्षकांसह कार्यकर्त्यांचेही लक्ष वेधले आहे.     
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हय़ातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांवर आपला हक्क कायम ठेवला आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने आलेल्या पक्षनिरीक्षकांनी व स्थानिक नेतृत्वानेही दोन्ही जागा राष्ट्रवादीकडूनच लढविल्या जाणार असल्याचे आवर्जून सांगितले आहे. सोलापूर जिल्हय़ातील सिकंदर टाकळी येथील भीमा साखर कारखान्याच्या कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी कारखान्याचे अध्यक्ष धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या लोकसभा उमेदवारीचे सूतोवाच केले होते. मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीतही महाडिक यांचे नाव पुढे आले होते. इतके होऊनही महाडिक मात्र अद्यापही राष्ट्रवादीचा उमेदवार असल्याचे स्पष्टपणे सांगत नाहीत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमावेळी लोकसभा निवडणूक लढविण्याचा पुनरुच्चार केला होता, पण पक्षाचे नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवले होते. पक्षाकडून अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करायचे नाही, अशी महाडिक यांची भूमिका दिसते.     
हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारीही अशीच अधांतरी आहे. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे नाव पुढे येत असले तरी ते लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर मतदारसंघातील खासदार सदाशिवराव मंडलिक, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसचा असल्याचा दावा ठामपणे केला आहे. या साऱ्या वादविवादाच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मतदारसंघाच्या जागावाटपाबाबत कोणती भूमिका जाहीर करणार हे महत्त्वपूर्ण ठरले आहे.     
देशात व राज्यात सत्तांतर घडविण्याच्या इराद्याने राज्यातील महायुती सक्रिय झाली आहे. इचलकरंजी येथे झालेल्या पाच पक्षांच्या महासभेला मिळालेला प्रतिसाद हा विरोधकांना विचार करायला लावणारा होता. या सभेत रामदास आठवले वगळता उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर या चौघांनी पवार काका-पुतण्यावर चौफेर हल्ला चढवत त्यांचे वस्त्रहरण केले. या झाडाझडतीने राष्ट्रवादीची बोलती बंद होण्याची वेळ आली असताना शरद पवार आपल्यावरील टीकेला कोणते प्रत्युत्तर देणार हे लक्षवेधी बनले आहे. विरोधकांच्या हल्ल्याने नाउमेद झालेल्या कार्यकर्त्यांना पवारांकडून कोणता डोस दिला जाणार हेही महत्त्वाचे बनले आहे.     
राज्यातील प्रमुख साखरपट्टा म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. या भागात आल्यावर शरद पवार यांच्याकडून साखर उद्योगावर भाष्य होणे अपरिहार्य आहे. नुकतीच कर्नाटक शासनाने तेथील साखर कारखानदारांची बैठक घेतली असता उसाला २५०० रुपयांची पहिली उचल देण्यास सुचविले होते, पण साखर कारखानदारांनी हा निर्णय मान्य केलेला नाही. सीमाभागातील अर्थकारणाचे पडसाद कोल्हापुरात लगेचच उमटत असल्याने या निर्णयाचा कोल्हापुरातील साखर कारखानदार कशा पद्धतीने विचार करणार हे उल्लेखनीय ठरले असतानाच शरद पवार यांचा दौरा या दिशेने निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा असल्याची चर्चा साखर उद्योगात आहे. महासभेमध्ये खासदार शेट्टी यांनी आयात होणाऱ्या कच्च्या साखरेच्या व्यवहारात रेणुका शुगर्सच्या अध्यक्ष विद्या मुरकुंबी व शरद पवार यांचे आर्थिक संबंध गुंतल्याचा आरोप केला असल्याने त्याची दखल पवार कशी घेतात हे महत्त्वाचे आहे. साखरेचे घसरलेल्या दरामुळे साखर कारखानदारी आर्थिक संकटात येत चालली असल्याचे विधान पवारांनी अलीकडे वारंवार केले आहे. त्यामुळे बदलत्या स्थितीत ते ऊस, साखर या विषयांवर कोणते भाष्य करणार याकडे कृषी-औद्योगिक क्षेत्राच्या नजरा वळल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Today attention to sharad pawar tour of kolhapur

ताज्या बातम्या