मराठवाडय़ातील रेल्वेविषयक प्रश्नांबाबत सिकंदराबाद येथे उद्या (मंगळवारी) विविध संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून मराठवाडय़ावर नेहमी अन्याय होत आहे. नवीन रेल्वेमार्गाचे निर्माण असो की वसमत-गंगाखेडला  थांबा न देणे, गाडय़ांची कमतरता, नांदेड-औरंगाबाद रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष करून नांदेड-सिकंदराबाद मार्गावर मात्र सर्व सुविधांचा वर्षांव करण्यात येत आहे. याच मार्गावर दरवर्षी गाडय़ांची संख्या वाढविली जाते. मराठवाडय़ातील जिल्हा केंद्रांना परस्पर जोडून रेल्वे संपर्क दिले जात नाहीत, असे अनेक प्रश्न विभागात निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांकडे दक्षिण मध्य रेल्वे विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केला.
या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या सिकंदराबाद रेल्वे विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटना, वसमत नगर रेल्वे संघर्ष समिती, विलासराव देशमुख विकास विचार मंच (उदगीर), मराठवाडा जनता विकास परिषद (लातूर), मराठवाडा विदर्भ रेल्वे विकास समिती (िहगोली) या संघटना आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, अरुण मेघराज, प्रभाकर वाईकर, राजेंद्र मुंडे, अॅड. प्रताप बांगर, नवीनकुमार चोकडा, दीपक कुलथे, जगदीश मोरे आदींनी केले आहे.