देशात सर्वंकष दलित चळवळ उभी राहावी. सर्व दबलेल्या वर्गासह अल्पसंख्याक एकत्र आले तर त्यांची मोठी ताकद निर्माण होईल, असे मत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत बाबू जगजीवनराम यांच्या राष्ट्रीय स्मारक उभारणीच्या कामास लवकरच मंजुरी मिळणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ सोलापूर शाखा, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग व संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप तसेच विविध व्यवसायासाठी कर्ज वाटपाचा कार्यक्रम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. ना. किलरेस्कर सभागृहात आयोजिलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष, माजी मंत्री बबनराव घोलप यांनी भूषविले. याप्रसंगी चर्मकार समाजाचे संजय सावकारे यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल त्यांचा शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक लांबतुरे यांनी स्वागत तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या सुरेखा लांबतुरे यांनी प्रास्ताविक केले.
शिंदे म्हणाले, दलितांना जेथे जेथे संधी मिळते, तेथे तेथे कर्तृत्व दाखवून दलितांनी पुढे आले पाहिजे. कर्तृत्व असेल तर संधी मिळतेच. दलितांनी आपले नेतृत्व केवळ आपल्या समाजापुरते सीमित न ठेवता परिघाच्या बाहेर येऊन अन्य समाजाच्या वर्गाचा विश्वास संपादन केला पाहिजे. बाहेरच्या वर्गाने स्वीकारलेले दलित नेतृत्व व कर्तृत्व पुढे आले तर देशाची लोकशाही आणखी समृध्द होईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
दलितांनी जातीवर आधारित आपले पिढीजात व्यवसाय सोडले पाहिजे, जाती धंद्यावरून ठरल्या आहेत. त्या बदलाव्यात अशी भूमिका आपण सातत्याने मांडत आलो आहोत, असे नमूद करताना शिंदे यांनी या कार्यक्रमात चर्मकार बांधवांना चर्मद्योग व्यवसायाशिवाय लाकूड-फर्निचरसारख्या अन्य व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
बाबू जगजीवनराम यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे स्मरण करताना शिंदे यांनी नवी दिल्लीत बाबू जगजीवनराम ज्या बंगल्यात वास्तव्य करीत होते, त्या ६ हेस्टिंग्ज रोडवरील बंगल्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बबनराव घोलप यांनी चर्मकार समाजाचा सामाजिक स्तर विकसित होण्यासाठी बाबू जगजीवनराम विकास आयोग स्थापन होण्यासाठी येत्या २४ सप्टेंबररोजी पुण्यात महासंमेलन आयोजित करणार असून त्यासाठी जगजीवनरामांच्या कन्या तथा लोकसभेच्या सभापती मीराकुमार यांना आमंत्रित केले जात आहे. त्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनीही सहयोग द्यावा, असे आवाहन केले. त्याचा धागा पकडून शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे यांचेही भाषण झाले.
या कार्यक्रमास माजी आमदार सदाशिव बेनके, अश्विनी सहकारी रुग्णालयाचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल, विष्णुपंत कोठे, राजशेखर शिवदारे, प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर आदी उपस्थित होते. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले.