विदर्भासह मराठवाडा, शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातील गंभीर रुग्णांनाही तातडीने फायदा होऊ शकणाऱ्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) बांधकाम पूर्ण झालेले ट्रॉमा केअर सेंटर आता केव्हा सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत २००९ मध्येच बांधकामास मंजुरी मिळूनही तत्कालीन आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारत बांधकामास उशीर झाला. आता नवीन सरकारने तरी रेंगाळलेल्या या समस्येकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेडिकलच्या नविनीकरणासाठी पंतप्रधान आरोग्य योजनेंतर्गत पाच वषार्ंपूर्वी १५० कोटी रुपये मंजूर झाले. त्यातील ११.६० कोटी रुपयांची तरतूद ट्रॉमा केअर सेंटरसाठी करण्यात आली. असे असले तरी या सेंटरची इमारत बांधण्यासाठी उशीरच झाला. शेवटी, वाढत्या दबावामुळे तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी लक्ष घातले. यानंतर १६ ऑगस्ट २०१२ रोजी या सेंटरच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले. ६ हजार ८८० चौरस मिटर जागेत असलेल्या या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ते सुरू असतानाच तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी ट्रॉमा केअर सेंटरसाठी ६०० पदांचा प्रस्ताव मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठवला, परंतु संचालकांनी आणखी काही पदे कमी करून हा प्रस्ताव परत पाठवण्याची सूचना केली.
त्यानुसार दुसऱ्यांदा ४०० पदांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. तोही नाकारण्यात आला. यानंतर ७ फेब्रुवारी २०१४ रोजी ३०१ पदांचा प्रस्ताव पाठवण्यात आला. संचालनालयाने हा प्रस्ताव १८ फेब्रुवारी २०१४ रोजी मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला. या प्रस्तावाला आता ८ महिने लोटून गेले तरी मंजुरी मात्र मिळालेली नाही. या पदासांठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याने हे सेंटर सुरू होण्यास आणखी विलंब लागणार आहे, हा प्रश्नच आहे. ‘अ’ दर्जाच्या या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये तळमजल्यावर स्वागतकक्ष, चिकित्सा विभाग, शस्त्रक्रिया गृह, सिटी स्कॅन, एमआरआय, डिजिटल एक्स-रे यंत्र, पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड असणार आहेत. पहिल्या मजल्यावर दोन मोठे शस्त्रक्रिया गृहे, अतिदक्षता विभाग, बाह्य़रुग्ण विभाग, तर दुसऱ्या मजल्यावर पुरुष व महिलांचा वॉर्ड राहणार आहे. या सेंटरसाठी मेंदूरोग, अस्थिरोग, हृदयरोग, पोटविकार, मूत्रपिंड विभागासाठी प्रत्येकी एक प्राध्यापक व तेवढय़ाच सहयोगी प्राध्यापकांशिवाय, वर्ग दोनचे १८ सहयोगी प्राध्यापक, ११ वरिष्ठ निवासी डॉक्टर, टय़ूटर, प्रशासकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. मेडिकलमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक विभाग स्थापन करण्यात आले. मात्र, त्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्यात आली नाही. अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची या विभागात रवानगी करण्यात आली. त्यामुळे अन्य विभागावर कामाचा ताण पडत आहे. ट्रॉमा केअर सेंटरसाठी मेडिकलमधील कर्मचारी पाठवू नये, अशी मागणी होऊ लागली आहे.

इमारतीचे हस्तांतरणच नाही
ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी संबंधित कंत्राटदाराने मेडिकलच्या प्रशासनाला ही इमारत हस्तांतरितच केलेली नाही, तसेच हा कंत्राटदार काम पूर्ण व्हायचेच असल्याचे सांगून त्याचे हस्तांतरण करणे टाळत आहे. ११.६० कोटी रुपये खर्चाच्या या इमारतीस १४ कोटी रुपये खर्च झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे तो बांधकामच पूर्ण झाले नसल्याचे सांगत आहे. हा घोळ संपवणे गरजेचे आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने हे सेंटर सुरू करण्यासाठी १०० कर्मचारी देण्याची तयारी दर्शवून त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. इमारत हस्तांतरणाचा घोळ संपला की, येत्या मार्च २०१५ पर्यंत ट्रॉमा केअर सेंटर सुरू होईल.
डॉ. अभिमन्यू निसवाडे (अधिष्ठाता- मेडिकल)

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trauma care center in vidarbha
First published on: 10-12-2014 at 07:55 IST