सतत अस्वस्थ आणि धगधगत्या निखाऱ्यासारखी चटका देणारी सामाजिक जाणीव, भाषेत कायम शेतकऱ्यांच्या शत्रूवर निर्दयीपणे तुटून पडणारा त्वेष, निवांतपणाचा तर जराही लवलेश नाही. अशाच कायम तळपत्या रूपात ब. ल. तामसकर यांना मित्र-परिचित आणि कार्यकर्त्यांनी पाहिले आहे. ‘ब.ल.’ या नावानेच त्यांची सर्वत्र ओळख. कुठेच एका ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य करण्याचा ‘ब.लं.चा’ पिंड नाही. चळवळ आणि आंदोलनाच्या धुमश्चक्रीत या माणसाला अजून तरी मुक्कामाची जागा शोधता आली नाही. प्रवास अजूनही सुरूच.. या प्रवासाची वाट तरी कोणती?
पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोश धावलो ध्येय पथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव पाहिले न मागे
बांधू न शकलो प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
हा या साऱ्या प्रवासाचा निष्कर्ष आणि पायतळी ‘अंगार’ असलेली ही वाट. साहित्यात-पुस्तकात सगळीकडे ‘हिरवेगार मळे’ दिसतात. ‘शेतकरी संघटना’ या चळवळीचे प्रणेते शरद जोशी यांनी ओळख करून दिली ती ‘अंगारमळ्या’ची. ‘ब.लं.’चे उभे आयुष्य म्हणजे या अंगारमळ्याच्या वाटेवरचाच प्रवास.. १९७३-७४ साली विज्ञान शाखेत पदवीधर असलेल्या ‘ब. ल.’ना कुठेही सुरक्षित नोकरी मिळाली असती. मात्र रुढ आणि मळलेली वाट नाकारून त्यांनी आपली वेगळी वाट निर्माण केली. २७ मार्च १९७४ रोजी वसमतला कालवा निरीक्षकाच्या दीडशे जागांसाठी साडेचार हजार तरुण जमा झाले. प्रत्यक्षात पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी सर्व बेरोजगार तरुणांची थट्टाच चालविली होती. एवढय़ा मोठय़ा संख्येने आलेले तरुण अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईविरुद्ध पेटून उठले. त्यावेळी या साऱ्या तरुणांसमोर ‘ब. ल.’चे भाषण सुरू होते. तरुणांना पांगविण्यासाठी त्याच वेळी पोलिसांनी गोळीबार केला. यात दोन तरुण हुतात्मे झाले. मराठवाडा विकास आंदोलनाची ठिणगी पडली ती इथे.. विद्यार्थी चळवळ आणि युवकांची आंदोलने सुरू असताना संघर्ष हाच ‘ब. ल.’च्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव बनला. औंढा नागनाथ हे त्यांचे गाव. गेल्या दोन-तीन वर्षांत ते जरा गावी जास्त रमले, पण आधी मुद्दाम त्यांना भेटायला येणाऱ्या माणसाची औंढय़ात भेट होईलच, याची खात्री नव्हती. १९८२ मध्ये ते गावाकडे दूध डेअरी चालवत होते. याच काळात शरद जोशी यांनी दुधाच्या दरवाढीवरून आंदोलन चालवले होते. नेमक्या याच काळात ते शेतकरी संघटनेशी जोडले गेले. पुढे शेतकरी संघटना हा जणू त्यांचा श्वास बनला. उभी हयात एखाद्या चळवळीत घालविल्यानंतर साध्य काय, असे जर त्यांना आजही कुणी विचारले तर ‘ब. ल.’ म्हणतील, ‘मला या कामातून आनंद मिळतो. जोवर शेतकरी आणि जमीन या दोन गोष्टी आहेत, तोवर मी लढत राहीन’. कारावास त्यांच्यासाठी नवा नाही. संघटनेच्या अनेक आंदोलनात ते तुरुंगात गेले आहेत. आणीबाणीत अनंत भालेराव, बापू काळदाते, यांच्यासोबत अडीच महिने ते तुरुंगात होते. बंडखोरी त्यांच्या स्वभावातच आहे. ज्यांनी-ज्यांनी शेतकऱ्याला लुबाडले, त्यांच्या विरोधात ते कायम पेटून उभे राहतात. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारी व्यवस्था मुळासकट उखडली पाहिजे, या विचाराने कायम अस्वस्थ असणाऱ्या ‘ब.लं.’ना शांत आणि स्वस्थ कुणी अद्याप पाहिलेले नसेल.
परभणीत शेतकरी संघटनेचे अधिवेशन १९८४ साली झाले. त्यावेळी या अधिवेशनासाठी आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना थांबण्यासाठी जागाही मिळू नये, याची शिकस्त प्रस्थापित राजकारण्यांनी चालवली होती. ब. ल. हे त्या अधिवेशनात तळमळीने झटणारे प्रमुख कार्यकर्ते होते. शेतकरी संघटनेची ओळख त्या वेळी राज्यात सर्वत्रच झालेली होती, पण संघटनेचा तोवर कागदी बिल्ला होता. आज अस्तित्वात असलेला जो धातूचा लाल बिल्ला आहे, तोच मुळी परभणीच्या अधिवेशनापासून पुढे आला. या अधिवेशनात दस्तुरखुद्द शरद जोशी यांच्या छातीला तो बिल्ला ‘ब. ल.’ यांनी लावला. त्या बिल्ल्याचे तीन रुपये आणि ‘शेतकरी संघटक’ची वर्गणी त्यावेळी ‘साहेबां’कडून आपण घेतल्याचे ते अभिमानाने सांगतात. या अधिवेशनात राज्यातले शेतकरी आले आणि देशातल्या नऊ प्रांतांमधून शेतकरी चळवळीचे प्रतिनिधी आले होते. १० डिसेंबर १९८६ ला सुरेगाव (ता. औंढा नागनाथ) येथे कापसाच्या बाजारभावासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात तीन शेतकरी हुतात्मा झाले. आंदोलनाच्या आधी गाव न् गाव पिंजून काढले होते, पण ‘ब. ल.’ यांना आंदोलनाआधीच चार दिवस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी आंदोलनात त्यांनी आजवर हिररीने सहभाग नोंदवला आहे. आज ‘ब. ल.’ यांच्यावर प्रेम करणारी असंख्य कुटुंबे आहेत. शेकडो कार्यकर्त्यांच्या घरी ते हक्काने वावरतात. व्यक्तिगत स्वार्थ, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, राग-लोभ अशा क्षुद्र बाबींना त्यांच्याजवळ यत्किंचितही जागा नाही. ‘बँकेचे अधिकारी वसुलीसाठी आल्यानंतर आपल्या बापाला लपून बसावे लागले होते, ज्या व्यवस्थेने एवढी अवहेलना आपल्या बापाच्या पदरी टाकली त्याचा सूड घेण्यासाठी पुढे आयुष्यभर संघर्षच करील आणि व्यवस्थेचा बदला घेईल’ याच ध्येयाने आपण ही वाट चाललो, असे ‘ब. ल.’ आवर्जून नमूद करतात. ज्यांच्या विचारांवर अतोनात प्रेम केले आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहण्याची प्रबळ ऊर्मी आहे, त्या शरद जोशींच्या हस्तेच या वाटेवरच्या एका वळणावर आज ‘बलं’चा सन्मान झाला आहे. मी मेल्यानंतर माझी भाषा ‘ब. ल.’ बोलेल असा निर्णायक शब्द शरद जोशी यांनी याच कार्यक्रमात उच्चारला. यापेक्षा आणखी मोठा गौरव कोणता? हे वळण म्हणजे मुक्काम नाही, तर घडीभराचा थांबा आहे, याचीही जाणीव ‘ब. ल.’ यांना निश्चितपणे असेलच!