‘त्रिधारा शुगर’ने चालू हंगामात १ लाख ७० हजार मेट्रिक टन गाळप केले. तीन लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. पुढील हंगामात ऊस कमी पडू नये, म्हणून जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्रिधारा शुगरचे मुख्य संचालक तहसीन अहमद खान यांनी दिली.
त्रिधारा शुगर्सकडून शेतक ऱ्यांना सर्वाधिक २ हजार ५० रुपये प्रतिटन भाव दिला जात आहे. चालू वर्षांत साखर उतारा ११.३८ असून आजपर्यंत १ लाख ८३ हजार क्विंटल साखर तयार झाली. चालू हंगामात ३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट होते. आजपर्यंत १ लाख ७० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत ३ लाख टन गाळप होईल. नृसिंह कार्यक्षेत्रातील ऊस जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या जायकवाडीमध्ये पाणी नसल्यामुळे ऊस जगवण्याची अडचण लक्षात घेऊन बँक व कारखान्याच्या अर्थसाह्य़ातून शेतक ऱ्यांना ठिबक सिंचनसंचास कर्ज दिले आहे. या अर्थसाह्य़ातून जवळपास तीन हजार हेक्टरवर ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील हंगामात उसाची टंचाई भासणार नाही, असा विश्वास श्री. खान यांनी व्यक्त केला. पुढील हंगामात सात हजार लिटर क्षमतेचे बिसलरी, तसेच २७ मेगावॉट वीजनिर्मितीचे युनिट सुरू करण्यात येणार आहे. कारखाना परिसरात शंभर कोटी लिटरचा तलाव बांधला आहे. त्यामुळे सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती श्री. खान यांनी दिली.