ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे तिघे बांधकाम कामगार जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी दुपारी बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथे घडला. अपघातानंतर सुसाट वेगाने जाणा-या ट्रकचालकाने पोलीस शिपाई अशोक पाटील यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. कोडोली पोलिसांनी नाकेबंदी करून पळून जाणा-या ट्रकचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात हणमंत बापू वाघमारे (वय ३५, रा. कृष्णानगर, तारदाळ), श्रीकांत श्यामराव वडर (वय ३०, रा. दत्तनगर) यांच्यासह एक ओळख न पटलेली व्यक्ती असे तिघेजण ठार झाले.
इचलकरंजीतील बांधकाम कामगार पन्हाळय़ाजवळील एका गावात कामासाठी गेले होते. तेथील काम आटोपून ते परत इचलकरंजीकडे येण्यासाठी निघाले होते. तिघेही स्कूटरवरून (एम.एच.०९-झेड-४६६२)वरून निघाले असताना ते बोरपाडळे येथील संजय औद्योगिक गॅस कंपनीजवळ आले असता मागून येणा-या ट्रकने (एम.एच.०९-७३७५) जोरदार धडक दिली. त्यामध्ये स्कूटरवरून जाणारे तिघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रकचालक शिवाजी नारायण देवकाते (वय ३७, रा.,कासारवाडी, ता.परळी, जि. बीड) हा सुसाट वेगाने कोडोलीच्या दिशेने निघाला होता. अपघात प्रत्यक्ष पाहिलेल्या एका मोटारसायकलस्वाराने ही माहिती कोडोली पोलिसांना दिली. कोडोली पोलिसांनी ट्रकला पकडण्यासाठी नाकेबंदी केली. पोलीस शिपाई अशोक पाटील यांनी भरधाव वेगाने जाणा-या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ट्रकचालकाने पाटील यांच्या अंगावरच वाहन घालण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी शिताफीने सापळा रचत ट्रकचालक देवकाते यास ताब्यात घेतले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2014 रोजी प्रकाशित
ट्रकची धडक, तिघेजण जागीच ठार
ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे तिघे बांधकाम कामगार जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी दुपारी बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथे घडला.
First published on: 20-02-2014 at 03:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Truck crash three people killed in accident