भरधाव ट्रकने एका सहा वर्षीय बालिकेला चिरडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चिखली-बुलढाणा राज्य मार्गावर साखळी फाटय़ानजीक हॉटेल सुखदेवसमोर काल झालेल्या अपघातानंतर संतप्त नागरिकांच्या जमावाने तो ट्रक पेटवून दिला. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकची आग विझवून परिस्थिती आटोक्यात आणली. मृत बालिकेचे नाव वैष्णवी ज्ञानेश्वर दांडगे असून ती नांद्रा क ोळी येथील होती.
अंत्री फाटय़ावर वाकोडे यांच्या मळ्यात राहणाऱ्या तुकाराम महाले यांच्याकडे वैष्णवी ज्ञानेश्वर दांडगे ही चिमुकली दीपावलीसाठी आली होती. काल दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास वैष्णवी व तिची मामे बहीण कमल महाले (५) या दोन चिमुकल्या शेताजवळच्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर रस्ता ओलांडतांना चिखलीहून भरधाव वेगाने येणाऱ्या राजूर येथील एम.एच. ०६/के/ ४७७३ या क्रमाकांच्या ट्रकने वैष्णवीला जबर धडक दिली. त्यात ती चिरडली गेली. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर फाटय़ावरील संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक पेटवून दिला. जमावाचे आक्रमक रूप पाहून ट्रकचालक पळून गेला. त्यानंतर बुलढाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकची आग व परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.