पद्मशाली समाजातील दोन गटांतील वादाला आता अनेकजण कंटाळले आहेत. समाजात निर्माण झालेली तेढ दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून येत्या रविवारी समाजाची समन्वय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
पद्मशाली युवा समन्वय संघमच्या वतीने श्रीकांत वंगारी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महिला विडी कामगारांच्या हस्तेच समन्वय प्रचाराला प्रांरभ करण्यात आला. त्यासाठी झारेकर गल्लीत प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती. भारती मेरगू, संगीता सब्बन, जयश्री क्यातम, सीमा मुदिगोंडा, रेणुका चिलका आदींच्या हस्ते या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. वर्षांखेरीच्या पूर्वसंध्येला येत्या रविवारी (दि. ३०) दादा चौधरी विद्यालयात ही परिषद होणार आहे.यासंदर्भात प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात समजातील या वादाचा नेमका उल्लेख करण्यात आलेला नाही, मात्र मरकडेय शाळा व मार्कंडेय देवस्थानच्या वादावरूनच समाजात नाराजी व्यक्त होते. समाजातील दोन गटांत विकोपाला गेलेला हा वाद समन्वयाने मिटवावा अशीच समाजातील अनेकांची इच्छा आहे. या वादातील बाह्य़शक्तींचा हस्तक्षेपही अनेकांना मान्य नाही. या पाश्र्वभूमीवर पद्मशाली युवा समन्वय संघमच्या या प्रयत्नांचे स्वागत केले जात आहे.
वंगारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील समाजात गेल्या काही महिन्यांपासून काही अप्रिय घटनांमुळे समाज बांधवांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता दूर करून समाजातील युवा शक्तीला विधायक वळण देण्यासाठी समन्वय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या प्रचार बैठकीत डॉ. प्रशांत सुरकूटला यांनी नव्या पिढीने समाजातील घडामोडींमध्ये सकारात्मक हस्तक्षेप करून या गोष्टींना योग्य दिशा देण्याची वेळ आली आहे, हे स्पष्ट केले. त्यासाठी परिषदेमध्ये समाजबांधवांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. अतुल कोलपेक हेही त्यासाठी प्रयत्नशील आहेत.