तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथाचे महत्त्व कमी होणार नाही. ग्रंथ वाचनामुळे व्यक्तीचा विकास होऊन नवीन दिशा प्राप्त होत असते. त्यामुळे ही वाचन संस्कृती जोपासण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक ग्रंथालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने जिल्हा माहिती कार्यालय आणि शासकीय जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहर सभागृहाच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव- २०१३ च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा होते. व्यासपीठावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, साहित्यिक संभाजी होकम, ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र गोटा, शासकीय जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल वि.मु. डांगे उपस्थित होते. भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की, ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्य़ाला महत्त्वाची भेट मिळाली आहे. उत्कृष्ट व्यक्ती निर्माण करण्याचे कार्य साहित्य करीत असते. सध्या तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार झाला असला तरी ग्रंथ व पुस्तकांचे महत्त्व कुठेही कमी झालेले नाही. ‘वाचाल तर वाचाल’ अशी म्हण असून प्रतिकूल परिस्थितीतही व्यक्ती घडवण्याचे कार्य पुस्तक करीत असते. वाचनामुळे अनेक सांस्कृतिक बदल झालेले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कुलगुरू डॉ. आईंचवार म्हणाले की, ग्रंथ हे महत्त्वाचे शस्त्र आहेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येक गावात ग्रंथालय उघडण्याची गरज आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. वाचनामुळे ज्ञानात, आचरणात व संस्कृतीत भर पडत असते. जिल्हाधिकारी कृष्णा म्हणाले की, विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व पटवण्यासाठी लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. शिक्षण केवळ रोजगारासाठी आहे, असा पालकांचा समज झाल्यामुळे विद्यार्थी वाचनाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाची संस्कृती व भाषा याबाबत फारशी माहिती राहत नाही.यावेळी पत्रकार रोहिदास राऊत, साहित्यिक संभाजी होकम यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र गोटा यांनी केले. संचालन गीता भरडकर यांनी, तर आभार वि.मु. डांगे यांनी मानले. तत्पूर्वी शहरातून ग्रंथ दिंडी काढली यावेळी राणी दुर्गावती कनिष्ठ कन्या महाविद्यालय, गाडगेबाबा विद्यालय, वसंत विद्यालय यांच्यासह विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक ग्रंथ दिंडीत सहभागी झाले होते.