पतीच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून पत्नीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी सुनावली.
लामजना (तालुका औसा) गावातील सत्यनारायण बजाज शेती व अन्य व्यवसायानिमित्त वास्तव्य करून होते. मात्र, त्यांच्या पत्नीची गावातील जमीन व घर विकून लातूर शहरात राहण्याची इच्छा होती. त्यासाठी ती पतीच्या मागे लकडा लावून होती. मात्र, पती तिचे म्हणणे गांभीर्याने घेत नव्हता. त्यामुळेच त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. गेल्या वर्षी ११ मार्च रोजी सत्यनारायण बजाज रात्री जेवण करून मुलासह झोपले होते. मध्यरात्री पत्नी लता हिने खून करण्याच्या उद्देशाने पतीच्या डोक्यात मोठा दगड घातला. त्यात त्यांना गंभीर जखम झाली.
 बजाज यांच्या ओरडण्यामुळे मुलगा जागा झाला. आईच्या हातात मोठा दगड पाहून त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारील लोक घटनास्थळी जमले. त्यांनी बजाज यांना रुग्णालयात दाखल केले व पोलीस पाटलांना घटनेची कल्पना दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पत्नी लतास अटक केली. दोषारोपपत्र तयार होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्यासमोर याची सुनावणी झाली व त्यानंतर त्यांनी आरोपी लतास दोषी ठरवून १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली