सराफ बाजाराप्रमाणे वाहन, घर, इलेक्ट्रॉनिक आदींची खरेदी, अक्षय्य तृतीयेपासून आंब्याचा स्वाद चाखणारे ग्राहक.. या सर्वाच्या प्रतिसादाने बाजारपेठेत या एकाच दिवसात कोटय़वधींची उलाढाल झाली.
अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. या दिवशी सोने खरेदीला जसे प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे आंब्याचा स्वाद चाखण्याचा हा पहिला दिवस मानला जातो. तसेच नवीन वस्तूंची खरेदी, घराची नोंदणी या मुहूर्तावर केली जाते. याकरिता व्यापाऱ्यांनी विविध योजना मांडून ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले. बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांवर सवलतींचा वर्षांव केला. त्याचा लाभ ग्राहकांनी उचलला. हा मुहूर्त साधून शहरातील अनेक भागांत सदनिकांची नोंदणी झाली. या क्षेत्रातील उलाढाल कोटय़वधींच्या घरात जाणारी ठरली. वाहन खरेदीतही चांगला उत्साह दिसून आला. या एकाच दिवशी शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री झाली. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे वा अन्य नव्या वस्तू घरी आणण्यासाठी अनेकांनी हा मुहूर्त निवडला. यामुळे बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्याचे पाहावयास मिळाले.
आंब्याचा स्वाद चाखण्याचा हंगामातील हा पहिला दिवस मानला जात असल्याने उत्तर महाराष्ट्रातील फळांच्या बाजारात आंबे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळाले. दर वर्षी, अक्षय्य तृतीयेपूर्वी हापूस, लालबाग, पायरी, केशर, लंगडा, दशहरी असे विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल होत असतात. त्यामुळे ग्राहकांना योग्य पर्याय निवडण्याची संधी मिळते. यंदा, मात्र, तशी संधी मिळाली नसल्याचे बाजारात फेरफटका मारल्यावर लक्षात आले. कारण, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील जवळपास सर्वच फळ बाजारात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हापूस, पायरी, बदाम व लालबाग हे प्रामुख्याने चार प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध होते. यंदाच्या हंगामात ढगाळ हवामान व अवकाळी पावसाने आंब्यांचा मोहोर पुढे कालांतराने गळून पडला. परिणामी, नेहमीपेक्षा यंदा आंब्याची आवक मोठय़ा प्रमाणात घसरली. साहजिकच, त्याचा परिणाम आंब्याचे दर वधारण्यात झाला आहे. नाशिकच्या बाजारात हापूस १२० ते २०० रुपये किलो, लालबाग ४५ ते ५५, पायरी ७० ते ८० रुपये प्रति किलो असे दर आहेत. प्रतिकूल हवामानामुळे यंदा केशर, लंगडा व दशहरा हे आंबे बाजारात येऊ शकले नाहीत. जे आंबे बाजारात आले आहे, त्यांची आवक अतिशय कमी असल्याने दरात वाढ झाल्याचे घाऊक व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. नाशिककरांना कोकणातील हापूसचा आस्वाद देण्याकरिता अक्षय्य तृतीयेच्या पाश्र्वभूमीवर आयोजिलेल्या आंबा महोत्सवात यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. या ठिकाणी आंब्याची एक पेटी (दोन किलो) ३०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील या स्थितीमुळे अक्षय्य तृतीयेपासून आंब्याचा स्वाद चाखण्यासाठी सज्ज झालेल्या खवय्यांना जादा भाव मोजण्याची तयारी ठेवणे भाग पडले आहे.