विक्रोळी रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात प्रवाशाला मारहाण करणाऱ्या दोघांना रेल्वे पोलिसांनी दोन दिवसांनंतर आरक्षण केंद्रातूनच अटक केली. मारहाण करणारे अन्य दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
विक्रोळीच्या पश्चिमेस असलेल्या सूर्यानगर येथे राहणारा मोहम्मद आजीम वकील सैय्यद (३८) हा २५ डिसेंबर रोजी पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीसह दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस असलेल्या आरक्षण केंद्रामध्ये तिकीट काढण्यासाठी गेला होता. तेथे रांगेत उभे राहण्यावरून त्यांची विक्रोळी येथे राहणाऱ्या शंकर यमला येवलेकर (२८) याच्याशी बाचाबाची झाली. आरक्षण केंद्रामध्ये बनावट नावाने तिकीटे काढणाऱ्यांची गर्दी होती. शंकरच्या सोबत नागोर मोईनुद्दीन शेख (३२, रा. धारावी) याने मोहम्मदला धक्काबुक्की करण्यास केली. त्यांच्या बरोबर असलेल्या अन्य दोघांनीही मोहम्मदला मारहाण केली. मोहम्मदला त्या चौघांच्या तावडीतून सोडविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. रेल्वे सुरक्षा दलाचे रक्षकही त्यावेळी तेथे उपस्थित नव्हते.रक्तबंबाळ अवस्थेमध्ये मोहम्मद आरक्षण केंद्राबाहेर आला. त्यांची पत्नी आणि मुलगी अतिशय भेदरलेल्या अवस्थेत त्यांच्यासोबत होते. मारहाण करणाऱ्या चौघांनी त्याला पुन्हा धमकावले. मोहम्मद त्याच अवस्थेत स्थानकप्रमुखांकडे गेला. त्यांनी त्याला कुर्ला येथे रेल्वे पोलिसांकडे पाठवले. तेथे गेल्यावर त्याची वैद्यकीय तपासणी करून तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन दिवस आरक्षण केंद्राबाहेर पाळत ठेवली. अखेर गुरुवारी शंकर आणि नागोर हे आरक्षण केंद्रामध्ये आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्या दोघांनाही मुंबई पोलीस कायद्याच्या ११०/११७ अन्वये गुन्हा नोंदण्यात आला आहे.