पूर्ववैमनस्यातून तरूणावर करण्यात आलेल्या चाकूहल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी गुरूवारीही कान्हूरपठार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, पारनेरचे पोलीस निरीक्षक सुनिल शिवरकर यांनी आरोपींना लवकरच जेरबंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सकाळी ११ वाजता व्यवहार सुरू करण्यात आले.
सध्या तेथे तणावपूर्ण शांतता असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान,बुधवारी अटक करण्यात आलेल्या सचिन खोमणे व अनिल जेडगुले यांना पारनेर न्यायालयापुढे गुरूवारी उभे करण्यात आले असता त्यांना येत्या दि. १७ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
गावाचे नाव खराब होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी संयम पाळण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य आझाद ठुबे यांनी यावेळी बोलताना केल़े  शिवाजी व्यवहारे यांनी भांडणे होण्याचे मूळ राजकारणात असल्याने त्याचा ग्रामस्थांनी गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले. सरपंच गोकुळ काकडे, उपसरपंच शिवाजी शेळके, पोलीस उपनिरीक्षक विकास सोमवंशी, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष पाटील, विलास व्यवहारे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.