गिट्टीखदान पोलिसांनी शनिवारी पहाटे कोराडी मार्गावरील एका फ्लॅटवर छापा मारून आरोपींना अमरावती मार्गावर अ‍ॅक्सिस बँकेच्या कॅश व्हॅनवर दरोडा घातल्याप्रकरणी पकडले. त्या दोघांजवळून  ४१ लाख ८० हजार रुपये व गुन्ह्य़ात वापरलेले टाटा सफारी वाहन जप्त करण्यात आले. या दरोडय़ाची टीप देण्यात आली असल्याचे उघड झाले आहे.
चंद्रशेखर सुब्रमण्यम मुदलियार (रा. वॉक्स कूलरमागे, कोराडी मार्ग) व त्याचा चुलत भाऊ सेल्वाकुमार मुदलियार (उस्मान लेआऊट,  गोपालनगर) ही आरोपींची नावे आहेत. आरोपी चंद्रशेखर त्याच्या घरी रक्कम मोजत असल्याची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी तातडीने धाव घेतली. या वाहनाचा क्रमांक खापा येथील एका दुचाकीचा असल्याचे घटनेच्या काही तासातच उघड झाले होते. टाटा सफारी वाहन दाभ्यातील होते. आरोपी चंद्रशेखरने पिकनिकला जायचे असल्याचे सांगून ते भाडय़ाने मिळविले असल्याचे पोलिसांना संगितले.  गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चक्षुपाल बहादुरे, हवालदार चंद्रशेखर हलबे, चंद्रशेखर गभणे, रमेश चिखले, रामगणेश त्रिपाठी, अंकुश राठोड, योगेंद्र कोकाटे, संतोष राठोड यांनी ही कारवाई केली.
या दोन्ही आरोपींचा ‘रेकॉर्ड’ नसल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. दरोडय़ाची टीप देण्यात आली, यावर पोलीस ठाम आहेत. या कॅश व्हॅनवर ‘जीपीएस’ यंत्रणा लावण्यात आली होती. त्यावरील बऱ्याच नोंदी पोलिसांनी घेतल्या. वाहनाची गती घटनास्थळाआधी कमी करण्यात आली होती. केवळ दोन सुरक्षा जवानांजवळ बारा बोअरच्या बंदुका होत्या. त्यांनी दरोडेखोरांना अटकाव केला नाही, या बाबी संशयास्पद असून त्यांच्या मोबाईलचा सीडीआर तपासला जात आहे. या दोन जवानांपैकी एकजण सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक आहे. ज्या सिक्युरिटी एजंसीचे हे जवान आहे ती एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याची असून या दोघांना बंदुका चालविण्याचे प्रशिक्षणच नाही, असे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एजंसी मालकाला फटकारले.