पोलिसांनी विझविले, दोघे किरकोळ जखमी
न्याय मागण्यासाठी वृद्ध पिता व त्याच्या दोन मुलांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ इमारतीसमोर मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. पेटवून घेतलेले तिघे समोर दिसताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून विझविले आणि मेयो रुग्णालयात दाखल केले.
मोहम्मद आरिफ गुलाब रसुल, मोहम्मद फहीज मोहम्मद आरिफ व मोहम्मद कैफ मोहम्मद आरिफ ही आरोपींची नावे आहेत. हुंडय़ासाठी शारीरिक छळ केल्याच्या विवाहितेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी शनिवारी मोहम्मद फहीज मोहम्मद आरिफ (पती), मोहम्मद आरिफ गुलाब रसुल (सासरा), रुबीना मोहम्मद आरिफ (सासू), मोहम्मद कैफ मोहम्मद आरिफ (दीर) (सर्व रा. फहीजनगर यवतमाळ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कैसर तबस्सुम व मोहम्मद फहीज या दोघांचे लग्न २४ ऑगस्ट २०१३ रोजी झाले. तो राजकोटमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. त्यांचे लग्न होऊन पंधरा दिवस होत नाहीत तोच सासरच्या मंडळींनी हुंडय़ासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्यामुळे ती माहेरी नागपूरला आली. त्यानंतर नागपूरला आलेल्या पतीने तिचे तोंड उशीने दाबले आणि तिच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिने गिट्टीखदान पोलिसांकडे केली. तिचे वडील सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत.
हुंडय़ासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केल्याने मोहम्मद आरिफ गुलाब रसुल, मोहम्मद फहीज मोहम्मद आरिफ व मोहम्मद कैफ मोहम्मद आरिफ हे तिघेही व्यथित झाले. आज दुपारी ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीत गेले होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते बाहेर आले. दक्षिणेकडील फाटकातून बाहेर पडत असतानाच या तिघांनी ‘वुई वाँट जस्टिस’ अशा घोषणा दिल्या. बाहेर आल्यानंतर पदपथावर त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले आणि धावत फाटकातून आत गेले. फाटकाजवळच असलेल्या तंबुतील पोलिसांना ते दिसले. पोलीस त्यांच्या दिशेने धावले. त्यांनी लगेचच पेटलेल्या मोहम्मद आरिफ व मोहम्मद फहीज या दोघांचे पेटलेले शर्ट फाडले. सुदैवाने ते फार पेटलेले नव्हते. तिसरा मोहम्मद कैफ पेटलेलाच नव्हता.
हा गोंधळ पाहून फाटकाजवळ बघ्यांची गर्दी झाली. त्यात रस्त्यावर उभे वाहन चालक तसेच न्यायालयीन कामकाजासाठी आलेले लोक, कर्मचारी आणि वकिलांचा समावेश होता. पोलिसांनी बिनतारी यंत्रावरून नियंत्रण कक्षाला सूचना दिली गेली. नियंत्रण कक्षाच्या सूचनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. के. राठोड यांच्यासह सदर पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी लगेचच तिघांनाही मेयो रुग्णालयात दाखल केले. मोहम्मद आरिफ व मोहम्मद फहीज या दोघांच्या पोटाजवळ थोडे भाजले होते. किरकोळ भाजलेले असले तरी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना काहीवेळ विश्रांतीचा सल्ला दिल्याने पोलिसांनी त्यांची जबानी नोंदविता आली नाही. विवाहितेने केलेली तक्रार खोटी असून उलट तिचाच जाच होता. पोलिसांनी मात्र तिच्या तक्रारीवरून आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आमचे म्हणणे कुणीच ऐकून घेत नाहीय, आम्हाला न्याय हवा आहे, अशी व्यथा मोहम्मद कैफने मांडली. असे असले तरी हे तिघे उच्च न्यायालयाच्या इमारतीत कशासाठी गेले होते, हे स्पष्ट झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

..तर घटना टळली असती
पोलिसांनी आधीच या तिघांवर झडप घातली असती तर किमान पेटवून घेण्याचा प्रकार टळला असता, अशी कुजबुज या घटनेनंतर कानी आली. हे तिघे घोषणा देत बाहेर जात असताना फाटकाजवळच तंबूत दोन-तीन पोलीस होते. इतर आत जेवत होते. जेवत असलेले शिपाई जेवण अर्धवट सोडून बाहेर धावत आले. मात्र, पोलिसांनी या तिघांना पकडले नाही. ओरडणारे बाहेर गेले तेव्हा त्यांच्या मागेही पोलीस गेले नाहीत, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. फाटकाबाहेर पोलीस नव्हते, असे स्पष्ट झाले. बाहेर पोलीस होते तर त्यांचे या तिघांकडे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घटना घडल्यानंतर बाहेर दोन वाहतूक महिला पोलीस दिसले. जिल्हा न्याय मंदिर व सुयोग इमारतीपुढील रस्त्यावर पोलिसांची वाहने फिरत होती.

मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two son and father tries to suicide in front of hc
First published on: 12-11-2014 at 07:42 IST