भिंगारमध्ये वेगवेगळय़ा घटनांमध्ये मंगळवारी एकाच दिवशी दोन युवकांनी आत्महत्या केली. या दोन्ही घटना रात्री उशिरा लक्षात आल्या. पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
डॉ. आंबेडकर कॉलनीतील गौरव प्रवीण भोसले (वय १५) या शाळकरी मुलाने मंगळवारी दुपारनंतर राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. भिंगार हायस्कूलमध्ये नववीत तो शिकत होता. ही घटना आधी उघडकीस आली.
गवळीवाडय़ातील स्वप्नील संजय सपकाळ (वय २१) हा तरुण मंगळवारी सकाळपासूनच बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी कॅम्प पोलीस ठाण्यात तशी तक्रारही नोंदवली होती व परिसरात त्याचा शोध सुरू होता. सायंकाळी उशिरा लष्कर भागातील लकडी पुलाजवळील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. विहिरीच्या वरच्या बाजूलाच त्याची मोटारसायकल व चपलाही सापडल्या. त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो. मृत स्वप्नील हा भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय सपकाळ यांचा मुलगा होता.
एकाच दिवशी दोघा युवकांनी आत्महत्या केल्याने भिंगार परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. या दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कॅम्प पोलीस ठाण्यात या दोन्ही घटनांबाबत स्वतंत्रपणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक निरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2014 रोजी प्रकाशित
भिंगारमध्ये दोघांच्या आत्महत्या
भिंगारमध्ये वेगवेगळय़ा घटनांमध्ये मंगळवारी एकाच दिवशी दोन युवकांनी आत्महत्या केली. या दोन्ही घटना रात्री उशिरा लक्षात आल्या. पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

First published on: 30-01-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two suicide in bhingar