उल्हास नदीतील पाणीसाठा उतरणीला लागताच पाटबंधारे विभागाने संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ात पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील सर्व भागांमध्ये पाण्याचे योग्य नियोजन करताना ठाणे महापालिकेची कसोटी लागणार आहे. शहरात आवश्यकतेपेक्षा सुमारे १०० दक्षलक्ष लिटर जादा पाणीपुरवठा होऊनही अनेक भागांमध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण होते, असे चित्र वेळोवेळी दिसून आले आहे. या पाश्र्वभूमीवर आता प्रत्यक्ष पाणी कपात लागू झाल्याने ठाणे, कळवा, मुंब्रा या तीनही शहरांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी देताना मोठय़ा प्रमाणावर होणारी पाण्याची गळती तसेच काही गृहसंकुलांमधून होणारी पाण्याची नासाडी रोखण्याचे मोठे आव्हान पाणीपुरवठा विभागास पेलावे लागणार आहे.
दिवाळीची धामधूम संपत नाही तोच ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये १४ टक्केपाणी कपात लागू झाली आहे. उल्हास नदी हा ठाणे जिल्ह्य़ातील बहुतांश महापालिका आणि नगरपालिकांच्या पाणीपुरवठय़ाचा मुख्य स्रोत आहे. या नदीवर बारवी धरणाची उभारणी करण्यात आली असून त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कल्याण-डोंबिवली महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच स्टेम कंपनी पाणी उचलतात. ठाणे महापालिकेस दररोज सुमारे ५०० दक्षलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. यापैकी भातसा धरणातून महापालिकेस सुमारे २१०, औद्योगिक विकास महामंडळाकडून १००, मुंबई महापालिकेच्या पाणी योजनेतून ६० दक्षलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. स्टेम कंपनीकडून ठाणे शहरास सुमारे १२५ दक्षलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. या कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी २४ तासांसाठी बंद राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठय़ावर त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. या कपातीमुळे पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेला बरीच कसरत करावी लागणार आहे. सध्याच्या घडीस महापालिकेने प्रत्येक बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजनबद्ध वेळापत्रक आखले आहे. या पाणी कपातीचा सर्वाधिक फटका घोडंबदर, बाळकूम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, खारटन रोड परिसरांतील रहिवाशांना बसेल, असे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाण्याचे नियोजन करून शहरातील उंचावरील भागातही बुधवारी पाणीपुरवठा सुरू राहील, असे नियोजन सध्या तरी महापालिकेने केले आहे. तरीही कळवा, मुंब्रा तसेच ठाण्यातील काही भागांमध्ये होणारी पाण्याची नासाडी थांबविण्याचे मोठे काम महापालिकेस करावे लागणार आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या पट्टय़ात सुमारे ६० टक्क्य़ांहून अधिक इमारती, झोपडपट्टी तसेच गावठाण भागात ठराविक दराने पाण्याची बिले आकारली जातात. या पद्धतीनुसार कितीही पाणी वापरले तरी ठराविक दरानेच बिल आकारणी होत असल्याने काही भागात पाण्याची वारेमाप अशी नासाडी सुरू असल्याचे खुद्द पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. याला आळा घालण्यासाठी मीटरनुसार पाणीबिलाची आकारणी करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. असे असले तरी मीटर पद्धत प्रत्यक्षात येत नाही तोवर ही नासाडी कशी थांबवायची या विवंचनेत महापालिका आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेस दररोज आवश्यकतेनुसार १०० दक्षलक्ष लिटर इतका जादा पाणीपुरवठा होतो. तरीही अनेक भागांत पाणीटंचाई असल्याने या जादा होणाऱ्या पाणीपुरवठय़ाचे योग्य नियोजन महापालिकेस आगामी काळात करावे लागणार आहे.