गडद, कमी गडद रंग; बारीक फुले आणि वेलांची नक्षी, कार्टूनची विविध रूपे आणि विविध आकार असलेल्या छत्र्या आणि रेनकोट, अशी विविधतेने नटलेली दुकाने सज्ज झाली असून दुकानदार पावसाच्या आगमानाची वाट वाहत आहेत.
मृग नक्षत्र संपून गेले तरी मान्सूनचे आगमन अजून झालेले नाही. त्यामुळे पावसाच्या विलंबाचा सराव झालेल्या नागरिकांनी सध्या पावसाळ्यातील सुरक्षेची तयारी  करायला हळूहळू सुरुवात केली आहे. दुकानांमध्ये मुलांच्या आणि महिलांच्या छत्र्या आणि रेनकोटला तसेच महाविद्यालयातील मुला-मुलींची फॅन्सी जर्कीनला गेल्या चार पाच वर्षांत चांगली मागणी आहे. दुकानांमध्ये महिलांसाठी रंगीबेरंगी वन पीस, टू पीस रेनकोट उपलब्ध आहेत. निळ्या, जांभळ्या, बदामी, पिस्ता रंगाच्या रेनकोटला तसेच बारीक फुलांची, वेलांची नक्षी असलेल्या फुलसाईज रेनकोटला पसंती आहे. महिलांच्या रेनकोटची किंमत दीडशेपासून सुरू आहे. मुलांसाठी प्लेन आणि कार्टूनची चित्रे असलेल्या रेनकोटची दुकानांमध्ये गर्दी आहे.
टेडीबेअर, स्पायडरमॅन, कॉकीमॅन, टॉम जेरी, मिकी माऊस तसेच फळे आणि गाडय़ांची चित्रे असलेले आकर्षक रेनकोट बाजारात उपलब्ध आहेत. तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना दफ्तरासाठी स्पेशल बॉक्स बनवलेले रेनकोटही बाजारात पाहायला मिळतात. लहान मुलांच्या रेनकोटच्या किमती ८० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत आहेत. पावसाचे अजून आगमन न झाल्याने अजून बाजारात रेनकोट आणि छत्र्यासाठी गर्दी दिसून येत नाही.
रेनसूटच्या किमती ४०० रुपयांपासून पुढे तर जर्कीन ३०० रुपयांपासून पुढे आहेत. ब्रँडेड रेनकोटची किंमत ४०० रुपयांपासून पुढे आहे. डबल जर्कीन ३०० पासून एक हजार रुपयांपर्यंत आहेत. यामाहा, लिवाईस, टोयोटा, पूमा, आदिदास, अशा कंपनीचे जर्कीन बाजारात उपलब्ध आहेत. रेक्झिन, पॅराशूट मटेरियलला सध्या मागणी आहे, तर प्लॅस्टीक रेनकोटची मागणी कमी झाली आहे. मुलांसाठी कार्टून असणाऱ्या तर महिलांसाठी बारीक फुले असणाऱ्या छत्र्या दुकानात आहेत. सिंगल फोल्ड, डबल फोल्ड असलेल्या छत्र्या १५० रुपयांपासून तर लहान मुलांच्या ५० रुपयांपासून आहेत. पुरुषांच्या पारंपरिक छत्र्यांना मागणी दिसत नाही. कापडांच्या दुकानात रेनकोट तर बॅगच्या दुकानांमध्ये छत्र्या पाहायला मिळतात. काही मोसमी दुकानेही उभारलेली आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी रेनकोटच्या किमतीत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. पाऊस नसल्यामुळे गिऱ्हाईक येत नाहीत. धंदा होत नाही. त्यामुळे दुकानदारांना मिळकतीविना कष्ट करावे लागत आहेत.
 याबाबत सीताबर्डीवरील छाता बाजारचे मालक राजेश चौरसिया यांनी सांगितले, जोपर्यंत जोरदार पाऊस पडत नाही तोपर्यंत खरेदीला कोणीच येत नाही. शेतकऱ्याप्रमाणे आम्हांलाही पावसाची वाट पाहावी लागते. पाऊस थोडा लांबला तर काही दिवसांसाठी कोणी छत्र्या, रेनकोट खरेदी  करीत नाही. गेल्या दोन वर्षांत नागरिकांचे खरेदीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. सध्या ग्राहक फक्त चौकशी करीत आहे. त्यामुळे आम्ही पावसाची आतुरतेने वाट पाहात आहोत.