कराड दक्षिणचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी नववर्षांच्या पूर्वसंध्येला तारूख पंचक्रोशीतील वाडय़ावस्त्यांवर विकास कामाच्या निमित्ताने कार्यकर्ते, कष्टकरी शेतकरी व मतदारांशी संवाद साधला. गाठीभेटी, बैठका व स्नेहभोजन अशा आगळय़ावेगळय़ा दौऱ्यातून डोंगरी जनतेला नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामीण संस्कृती व लोकशाहीचे जतन करण्याचे आवाहन या वेळी उंडाळकरांनी केले.
कराड तालुक्यातील तारूख पंचक्रोशीतील बामणवाडी-शिबेवाडी-कारंडेवाडी या २२ लाख रूपये खर्चाच्या नळपाणी पुरवठा योजनेचे तसेच वानरवाडी नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन, कारंडेवाडी येथील २० लाख रूपये खर्चाच्या साकव पुलाचे भूमिपूजन, पवारवाडी व शिबेवाडी येथील अंगणवाडी खोल्यांचे उद्घाटन अशा विकास कामांच्या उद्घाटनानिमत्त आयोजित कार्यक्रमात उंडाळकरांनी मतदार संघातील जनतेसमोर आपले विचार मांडले. पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्या अनुराधा लोकरे, पंचायत समिती सदस्या वर्षां पाटील, कृष्णा साखर कारखान्याचे संचालक सर्जेराव लोकरे, कोयना दूध संघाचे अध्यक्ष संपतराव इंगवले, पहिलवान शिवाजीराव जाधव, प्रा. धनाजी काटकर, हरिभाऊ शेवाळे यांची या वेळी उपस्थिती होती.
उंडाळकर म्हणाले की, मी ४० वष्रे राजकारण व समाजकारण करताना, प्राधान्याने नाहीरे वर्गाचे प्रतिनिधित्व केले. या लोकांसाठी राजकीय सत्ता कारणी लावली, दुर्लक्षित भाग, सामाजिक विषमता व विकासापासून दूर राहिलेल्या मतदार संघाचा या चार दशकांच्या सत्तेत टप्प्याटप्याने परिपूर्ण विकास साधला. पाण्याचा थेंबन्थेंब अडवून दुष्काळावर मात केली. या भागात माण, खटावसारख्या दुष्काळाची असलेली परिस्थिती बदलून येथे सुजलाम् सुफलाम् असे वातावरण निर्माण केले आहे. आज परिस्थिती बदलली आहे. सत्ता सामान्य माणसापासून हिसकावून घेण्याचे धनदांडग्यांचे प्रयत्न सुरू आहेत. धाबा, दारू व पैशाच्या माध्यमातून आपलीच सामान्य मंडळी धनिकांच्या भूलथापांना बळी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही परिस्थिती बदलण्याचे आव्हान आपल्यासमोर असून, त्याचा खंबीरपणे सामाना करण्यासाठी येत्या काळात एकसंधपणे राहण्याचे आवाहन उंडाळकर यांनी केले. शिवाजीराव जाधव, डॉ. आबासाहेब पवार, प्रा. धनाजी काटकर, अशोकराव पाटील-पोतलेकर यांची भाषणे झाली. प्रास्ताविक बामणवाडीचे सरपंच विठ्ठलराव चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सरपंचांसह ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.