जिल्हास्तरीय भूमापन दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या वतीने येत्या १५ एप्रिल रोजी प्राचीन व आधुनिक जमीन मोजणी साधने व अभिलेखाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांसाठी कार्याशाळाही आयोजिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक बाळासाहेब वानखेडे हे उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी पाच वाजता महापौर अलका राठोड व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. राजेश प्रधान यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. यावेळी गुणवंत कर्मचाऱ्यांना सन्मानित केले जाणार आहे.
यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली असून या कार्यशाळेत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अमृत नाटेकर (भूसंपादन कायदा), अॅड. सुनील शेळगीकर (महाराष्ट्र जमीन महसूल कायदा), अॅड.उमेश मराठे (कमाल जमीन धारणा कायदा), क्रिडाईचे उपाध्यक्ष प्रदीप पिंपरकर (नगररचना कायदा) व जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे (मालमत्ता हस्तांतरण कायदा) या तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.