‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ अशी एक म्हण आहे. कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुलाची लग्नपत्रिका पाहिल्यावर याची आठवण येते. आपण एकदा आमदार झालो म्हणजे तहहयात आमदार आहोत आणि मंत्रीसुद्धा, या भ्रमात हा गुंड अजूनही वावरत आहे, तर नागपूरच्या एका काँग्रेस नेत्याला नेपाळचा भूकंप गेला खड्डय़ात, माझ्या मुलाला प्रसिद्धी कशी मिळेल, याचे वेध लागले आहेत. पराभव झाला, मंत्रीपद गेले तरी भ्रमात वावरणारा हा राजकारणी आणि गजाआड असूनही मंत्रीपदाची झूल अंगावर आहे, असा आभास निर्माण करणारा गुंड यांच्यात फरक काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
राजकीय नेते व गुंड यांच्यात काही फरकच राहिला नाही, अशी वाक्ये अनेकदा ऐकायला येतात. राजकारण करणारे गुंड व गुंडगिरी करणारे राजकारणी सदैव आपल्याच तोऱ्यात वावरत असतात. त्यांना सामान्यांशी काही घेणेदेणे नसते, हेच दर्शवणाऱ्या या दोन घटना आहेत. येथील कारागृहात सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईचा कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुलाचे लग्न सध्या गाजत आहे. या गुंडाला लग्नासाठी पॅरोल हवा आहे व प्रशासन तो द्यायला तयार नाही. त्यामुळे गवळीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या निमित्ताने सोशल मीडियावर फिरत असलेली या गुंडाच्या मुलाची लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या पत्रिकेत गवळीने स्वत:ला आमदार व मंत्री करून टाकले आहे. मुंबईतील दहशतीच्या बळावर हे महाशय एकदा आमदार झाले. नंतर मात्र त्याची डाळ शिजली नाही. आता गवळी माजी आमदार आहे, हे वास्तव आहे, पण ते स्वीकारायला हा गुंड तयार नाही. कारागृहात असूनही या गुंडाला आपण आमदार व मंत्री आहोत, असा भ्रम होत असेल तर तो आपल्या न्यायव्यवस्थेचा पराभव आहे. न्यायदानाच्या माध्यमातून शिक्षा ठोठावली जाते तीच मुळी गुन्हेगाराचे मनपरिवर्तन व्हावे यासाठी. इतके दिवस गजाआड राहूनही गवळीचे मनपरिवर्तन झाले नाही, हेच त्याने बाळगलेल्या भ्रमातून दिसून येते. याचाच अर्थ, त्याचा कारागृहातील थाट व रुबाब नक्कीच इतर कैद्यांना दिपवणारा असेल. गजाआड राहूनसुद्धा गवळी पत्रिकेत आमदार व मंत्री असल्याचा उल्लेख करू शकतो, याचाच अर्थ, तो भोगत असलेल्या शिक्षेने त्याच्यात काहीच फरक पडला नाही. विशेष म्हणजे, या गुंडाने पॅरोलच्या अर्जासोबत ही पत्रिकासुद्धा जोडली आहे. आमदार व मंत्री असल्याचा स्वत:चा भ्रम प्रशासनापुढे जाऊ देण्यात या गुंडाला काहीच वाटत नाही. त्यामुळे गवळी विद्यमान व्यवस्थेलाच जुमानत नाही, हेच स्पष्ट होते. आमदार व मंत्री असल्याची बतावणी करून गवळीला नेमके काय साधायचे आहे? गुंडांच्या वर्तुळात वचक निर्माण करायचा आहे की, आजवर त्याच्या दहशतीत राहिलेल्या लोकांना आणखी दडपणात ठेवायचे आहे?
दुसरी घटना काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याच्या भ्रमाची आहे. टगेगिरीच्या अनेक प्रकरणामुळे कायम चर्चेत राहणारे त्यांचे दिवटे चिरंजीव भूकं प झाला तेव्हा नेपाळमध्ये होते. हे चिरंजीव मित्रांसोबत तिकडे फिरायला गेले होते. या भूकंपाने अनेक जण हादरले. इकडले कोण तिकडे अडकले आहे, यावर मोठी चर्चा सुरू झाली. माध्यमांच्या वर्तुळात या संबंधीच्या बातम्या येत राहिल्या. भूकंपात अडकलेले काही दु:खी चेहरे त्यातून प्रकाशमान होत राहिले. ही फुकटात मिळणारी प्रसिद्धी बघून या माजी मंत्र्यांना मोह आवरला नाही. त्यांनी माध्यमांना लघुसंदेश पाठवून भूकंपात अडकलेला माझा मुलगा सध्या लखनौला पोहोचला आहे. त्याच्याशी बोला, अशी गळ घातली. या संदेशाची कुणीही दखल घेतली नाही व या दिवटय़ा चिरंजीवाला प्रसिद्धी दिली नाही, हे बरे झाले, पण यातूनही प्रसिद्धी मिळवण्याचा माजी मंत्र्यांचा सोस बरेच काही सांगून जाणारा आहे. भूकंप झाला तेव्हा नेपाळमध्ये असलेल्या या माजी मंत्रीपुत्राने कशाचीही तमा न बाळगता लोकांचे प्राण वाचवले असते, घरात असलेल्या राजकीय सेवागुणांचा संकटकाळी मदतकार्यात सहभागी होऊन परिचय दिला असता तर ते समजून घेता आले असते व त्याला प्रसिद्धीही मिळाली असती, पण तशी कोणतीही सेवा न देता परत आलेल्या या पुत्राला प्रसिद्धी मिळावी, असे या माजीमंत्र्याला वाटते, यातच राजकारणाचे अपयश दडले आहे. आपण राजकारणी आहोत म्हणजे राजे आहोत. बाकी जनता प्रजा आहे, याच भ्रमात ही मंडळी वावरत असतात. पराभव झाला तरी त्यांचा हा भ्रम दूर होत नाही. गुंडांचेही तसेच असते. ते सुद्धा स्वत:ला राजेच नाही, तर सम्राट समजत असतात. हासुद्धा भ्रमच असतो. गजाआड गेले तरी तो जात नाही. त्यातून लग्नपत्रिका व संकटसमयी सुद्धा मुलाची प्रसिद्धी अशी हौस जन्माला येते.