पुणे विद्यापीठातील दारू पार्टीबाबत चौकशी करून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिलीप ढवळे यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठाच्या सेवक विहाराजवळ बुधवारी रात्री दारू पार्टी झाली होती. ‘जवळच असलेल्या सभागृहामध्ये लग्न होते. त्यानंतर विद्यापीठाच्या आवारात ही पार्टी झाल्याचे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यापीठात फिरायला येणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर वेडय़ावाकडय़ा पडलेल्या खुच्र्या, दारूच्या बाटल्यांचा खच असे दृष्य दिसले होते. या प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. विद्यापीठाच्या आवारामध्ये दारू नेण्यास बंदी असताना, सेवक विहाराजवळच्या रस्त्यावर ही पार्टी कशी झाली. गेल्या वर्षी विद्यापीठाच्या आवारामध्ये एका सुरक्षारक्षकाचा खून झाल्यानंतर विद्यापीठाच्या आवारामध्ये सुरक्षारक्षकांची गस्त वाढवण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात येत होते.
मात्र, तरीही गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी ही पार्टी लगेच का थांबवली नाही. या बाबत विचारले असता डॉ. ढवळे यांनी सांगितले, ‘‘या बाबत चौकशी सुरू आहे. यामध्ये कोणी दोषी आहे का याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार असून या समितीच्या अहवालानंतर आणि कायदेशीर सल्ला घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल. असे प्रकार विद्यापीठाच्या आवारात पुन्हा घडू नयेत यासाठी विद्यापीठाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.’’