महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिला असताना आ. सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत सक्रिय झालेल्या त्रिकूटाबद्दल जैन गटामध्येच नाराजी व्यक्त होत आहे. आ. जैन हे घरकुल घोटाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्यापासून ‘सुरक्षित अंतर’ ठेवण्यात अनेक जण समाधान मानू लागले आहेत.
महापालिका निवडणूक पुढील वर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होणे निश्चित आहे. जळगावची तत्कालीन नगरपालिका असो की विद्यमान महापालिका, सुमारे तीस वर्षांचा सत्ताकाळ सुरेश जैन गटानेच भोगला आहे. अपवाद केवळ दीड-दोन वर्षांचा. भाजपने दीड वर्षांसाठी पालिका सांभाळली होती. अन्यथा पालिकेची निवडणूक आणि जैन गटाचे वर्चस्व या दोन गोष्टी ठरलेल्या आहेत. त्यामुळेच निवडणूक जवळ आल्यावर जैन गटाकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छूक धडपडत असत. यावेळी मात्र निवडणूक जवळ आली असताना सुरेश जैन हे न्यायालयीन कोठडीत आहेत. १० मार्च रोजी अटक झाल्यानंतर नऊ महिने उलटले तरी ते बाहेर येऊ शकलेले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीच्या पाश्र्वभूमीवर पालिका निवडणुकीसाठी जैन यांचा गट तयारीला लागला असला तरी एका त्रिकूटाबद्दल त्यांच्या गटाकडूनच नाराजीचा सूर उमटत आहे. जैन गटाची सूत्रे यापूर्वी पूर्णपणे त्यांचे खंदे समर्थक प्रदीप रायसोनी यांच्याकडे असत. पण घरकुल घोटाळ्यात रायसोनीही तुरुंगात आहेत. त्यांच्या तुरुंगवासाला पुढील महिन्यात वर्ष पूर्ण होईल. सुरे जैन व रायसोनी यांच्या अनुपस्थितीत सुरेश जैन यांचे बंधू रमेश जैन, नितीन लढ्ढा आणि राजु अडवाणी या तिघांकडे सर्व सूत्रे सोपविण्यात आली असल्याचे या गटातील ज्येष्ठांकडून सांगण्यात येते. सध्या या त्रिकूटाचीच अधिक चर्चा आहे. रमेश जैन यांच्यामुळेच घरकुल घोटाळा प्रकरण बाहेर आल्याचे म्हटले जाते. तत्कालीन आयुक्त प्रविण गेडाम यांना रमेश जैन यांनी अपशब्द वापरले नसते तर, प्रकरण वाढले नसते, असे त्यांच्या गटातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मत आहे.
नितीन लढ्ढा व राजू अडवाणी हे दोघे रमेश जैन यांच्यापेक्षा नवखे आहेत. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मत जाणून न घेताच हे त्रिकूट निर्णय घेत असते. आपणास विश्वासात घेत नाही, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत निवडणूक झाल्यास त्यांचे अनेक जुने समर्थक त्यांच्यापासून दूर जातील, याचे संकेत मिळू लागले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2012 रोजी प्रकाशित
जैन गटात त्रिकूटाविषयी नाराजी
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिला असताना आ. सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत सक्रिय झालेल्या त्रिकूटाबद्दल जैन गटामध्येच नाराजी व्यक्त होत आहे. आ. जैन हे घरकुल घोटाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्यापासून ‘सुरक्षित अंतर’ ठेवण्यात अनेक जण समाधान मानू लागले आहेत.
First published on: 05-12-2012 at 03:26 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsetness in jain group on trikut