नगर अर्बन सहकारी बँकेच्या वतीने यंदा प्रथमच शारदीय व्याख्यानमाला आयोजित केली असून ती दि. १७ ते २३ दरम्यान रोज सायंकाळी ५ वाजता बँकेच्या वैकुंठभाई मेहता प्रशिक्षण सभागृहात होईल. बँकेचे अध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी ही माहिती दिली.
बुधवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजता राज्य सरकारच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल व ते ग्रामविकासात सहकारी बँकांचे योगदान विषयावर पहिले पुष्प गुंफतील. गुरुवारी (दि. १८) शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे कला-संस्कृती, शुक्रवारी (दि.१९) प्रवचनकार शिरिषकुमार लहाडे यांचे आजच्या काळातील भक्तीची गरज, शनिवारी (दि. २०) प्रा. मंगेश जोशी यांचे ‘माझ्या लग्नाची गोष्ट’ हा एकपात्री प्रयोग, रविवारी (दि. २१) विविध क्षेत्रात समर्पित व सेवाभावी काम करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा सत्कार, सोमवारी (दि. २२) ज्ञानेश्वर कवडे यांचा ‘हसा पोटभर’ हा कार्यक्रम व समारोप मंगळवारी (दि. २३) आयएमएसचे संचालक प्रा. डॉ. शरद कोलते यांच्या बँकिंग व्यवस्थापनातील आव्हाने या व्याख्यानाने होईल. विजयादशमीला दरवर्षीप्रमाणे बाजार समितीच्या शाखेसमोर सिमोल्लंघन व पानसुपारीचा कार्यक्रम होईल.