बीएसयूपी योजनेत ठेकेदारास अयोग्यरीताने आगाऊ रक्कम दिल्याप्रकरणी नगर विकास खात्याने आशीष दामलेवगळता इतर सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सर्वसाधारण सभेत आशीष दामले यांनी या ठरावास विरोध केला होता. मात्र गैरहजर राहिलेल्या नऊ नगरसेवकांनाही नोटिसा बजाविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान अभियानांतर्गत बीएसयूपी योजनेतून शहरी गरिबांसाठी १६३४ घरे बांधण्यात येत आहेत.
जंकीन एन्टरप्रायजेस आणि काव्या बिल्टकॉन एन्टरप्रायजेस या दोन ठेकेदारांना हे काम देण्यात आले.
या कामासाठी त्यांनी मोबलायझेशन अ‍ॅडव्हान्स म्हणून पाच कोटी ८० लाख रुपयांची मागणी केली होती. सर्वसाधारणपणे सभेने ठराव मंजूर करून या ठेकेदारांना रक्कम दिली.
आशीष दामले यांनी मात्र त्यास विरोध केला होता. अशाप्रकारे आगाऊ रक्कम देता येत नसल्याचे आदेश शासनाने देताच ही रक्कम पालिकेने ठेकेदाराकडून वसूलही केली.
याप्रकरणी नगरविकास खात्याने यापूर्वीच तत्कालीन नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि मुख्याधिकारी सुदाम धुपे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.