मंगळवारपासून संमेलनास प्रारंभ
येथील मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी स्थापन होऊन ३५ वष्रे पूर्ण झाली आहेत. यानिमित्य पुसद येथे अलहाज अतहर मिर्झा मेमोरियल ट्रस्टच्या वतीने २५ डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय उर्दू परिषद व राष्ट्रीय एकात्मतेला समर्पित उर्दू कवी संम्मेलन (मुशायरा) होत आहे.
या कार्यक्रमास आझाद यांच्यासह कांॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे आणि राज्याचे अनेक मंत्री प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या काही मान्यवरांचा गुलाम नबी आझाद  यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व आयोजक डॉ. वजाहत मिर्झा यांनी अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी के.आय. मिर्झा शेख कयुम व महेश खडसे उपस्थित होते.
‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांची महामार्गावर जाळपोळ, पोलिसांचा लाठीमार
ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी तिवस्यात रोखला
अमरावती / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने आयोजित केलेला ‘ट्रॅक्टर मोर्चा’ पोलिसांनी तिवसा येथे अडवल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर लाकडी ओंडके पेटवून रोष व्यक्त केला. तिवसा येथे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमारही केला. यावेळी प्रहारच्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार बच्चू कडू यांना चर्चेसाठी नागपूर येथे बोलावल्याने मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे, पण सकारात्मक निर्णय घेतला न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार शेतमालाला योग्य भाव मिळावा, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नागपूर येथे ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भातील अनेक भागातून कार्यकर्ते आणि शेतकरी ट्रॅक्टर्समधून नागपूरकडे निघाले असताना बुधवारपासूनच पोलिसांनी ट्रॅक्टर्स रोखण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे बच्चू कडू यांनी आंदोलकांना तिवसा येथे पोहोचण्याचे आवाहन केले. सायंकाळी तिवसा येथे शेतकऱ्यांची त्यांनी सभा घेतली. हजारो कार्यकर्त्यांसह बच्चू कडू यांनी तिवसा येथील एका वीट भट्टीजवळ मुक्काम केला. सकाळी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने प्रहार संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. दुपापर्यंत कार्यकर्त्यांचा संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर ओंडके जाळून रोष व्यक्त केला. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. तिवसा येथील पेट्रोल पंप चौकातील सर्व दुकाने बंद केली. दिवसभर या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी चौकातून हेमंत तायडे, रोशन देशमुख, सुरेंद्र भिवगडे आणि मुकेश गुंडियाल या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी ओंडके पेटवल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून चर्चेसाठी संदेश आल्याने दुपारी दोन वाजता बच्चू कडू निवडक कार्यकर्त्यांसह नागपूरकडे रवाना झाले. मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात येत असला तरी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, अशी सूचना त्यांनी केली. हजारो कार्यकर्त्यांनी आज दिवसभर तिवसा येथे ठिय्या दिला. पोलिसांना मात्र या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. महामार्गावर ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांकडे शत्रूशी लढा देताना गनिमी कावा होता. आता प्रहारचा छावा आहे. भगतसिंहांनी देशासाठी बलिदान दिले, आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांनी बलिदान देण्याची वेळ आली आहे, असे बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रहार संघटनेने शांततेच्या मार्गाने मोर्चाचे आयोजन केले होते. मुख्यमंत्र्यांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले त्यावेळी आपण त्यांना विचारणा केल्यावर ट्रॅक्टर मोर्चा नको, असे त्यांनी सांगितले.
मग शेतकऱ्यांसाठी हेलिकॉप्टर पुरवा ते त्याने नागपूरला येतील, असे उत्तर आपण त्यांना दिले. शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे, त्यांना न्याय मिळवून देईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.