आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिका गौरी पाठारे यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीस उस्मानाबादकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मेघमल्हार सभागृहात गोविंदराव मुरुगकर स्मृत्यर्थ आयोजित ‘पॅशन.. दि म्युझिक कन्सर्ट’ कार्यक्रमात पाठारे यांनी विविध कलाकृती सादर केल्या.
मैफलीची सुरुवात मुरुगकर यांच्या कन्या डॉ. स्मिता शहापूरकर, डॉ. अभय शहापूरकर, प्रा. मुरुगकर, संगीत शिक्षक समुद्रे, श्रीमती पाठारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. पाठारे यांनी नंद राग गायिला. यात जयपूर घराण्याच्या दोन बंदिशी, एक विलंबित तालात व दुसरी द्रुत तालात ऐकविली. या नंद रागाला शास्त्रीय संगीतात आनंदी का राग असे म्हणतात याची प्रचिती पाठारे यांनी श्रोत्यांना करून दिली. यानंतर त्यांनी गुरू व आई डॉ. विद्या दामले यांच्या ‘बंदिश’ अल्बममधील गौड मल्हारात बांधलेल्या ‘घन गरजत बरसत’ या बंदिशीने श्रोत्यांना पावसाच्या सरीची अनुभूती मिळवून दिली. यास श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
उपशास्त्रीय संगीत ऐकवताना पाठारे यांनी बनारस घराण्याचा दादर ऐकविला. तसेच ‘विठ्ठल आमचे जीवन’ भजन ऐकवून भक्तिरसाची उधळणही केली. तसेच त्यांचे गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ आणि ‘या भवनातील’ ही नाटय़पदे सादर करून उपस्थितांना पं. अभिषेकी यांच्या गायकीची आठवण करून दिली.
मैफलीच्या उत्तरार्धात पाठारे यांनी वसंत रागातील तराणा सादर करून श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. ‘कब आवोगे तुम’ हा भैरवी रागातील अप्रचलित दादरा सादर करून, त्यानंतर ‘संत कान्होपात्रा’ या नाटकातील ‘अगा वैकुंठीच्या राया’ या भैरवीने मैफलीची सांगता केली. सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले.