मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यात पोलिसांनी पकडलेल्या अजमल कसाब या दहशतवाद्यास तब्बल चार वर्षांनंतर बुधवारी पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याचे वृत्त कळताच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अनेक संस्था, संघटनांकडून एकच जल्लोष करण्यात आला. दरम्यान, मुंबईवरील दहशतवादी हल्यात शहीद झालेल्यांना खऱ्या अर्थाने या फाशीमुळे श्रध्दाजंली वाहण्यात आली असल्याची प्रतिक्रिया आ. जयंत जाधव यांनी व्यक्त केली. तमाम भारतीयासांठी ही सुखद घटना असून देशविघातक कृत्य केलेल्या इतर अतिरेक्यांनाही त्वरीत फाशी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
मुंबईवरील हल्ल्यात अनेक निरपराध नागरिक, पोलीस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. या हल्ल्यातील अजमल कसाब या अतिरेक्यास जिवंत पकडण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले होते. अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये हल्लेखोरास जिवंत पकडण्याची ही पहिलीच घटना होय. त्यामुळे कसाबच्या पकडण्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व प्राप्त झाले होते. तब्बल चार वर्ष कसाबची सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी करण्यात आली. कसाबला फाशी देण्यात विलंब लागत असल्याने सरकावर दबाव वाढत होता. तसेच विरोधकांकडून होणारी टीकाही सहन करावी लागत होती. दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून विशेष गुप्तता पाळून बुधवारी सकाळी त्याला पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. हे वृत्त कळताच सर्वत्र या घटनेचे स्वागत करण्यात आले.
नाशिक येथे हिंदू एकता आंदोलनतर्फे द्वारका परिसरात आंनदोत्सव साजरा करण्यात आला. रामसिंग बावरी यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी पेढे वाटून घोषणाबाजी करीत सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. रिपाइंतर्फेही शहरात ढोल ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव यांसह नाशिकच्या ग्रामीण भागात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी आपल्या फलकांवर या निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन केले.