हुश्श!!! चार दिवसांची धडपड संपत आली असं वाटतंय. ‘व्हॉट्स अॅप’वरच्या मेसेजला ला ‘हू आर यू’ असं प्रश्नवजा उत्तर आलं. कसलं बर वाटलं माहित्येय. मग मी क्षणाचाही विलंब न लावता ‘मी तो स्पध्रेत पेटी वाजविणारा’ असं उत्तर धाडून दिलं. पण नंतर म्हटलं, माझा डीपी पाहून तिनं ओळखलं असणारच ना की मी कोण आहे ते. तरी ती असं का विचारते? असो काहीतरी विचारलंय हे कुठंच गेलं! तिचं ‘ओके’ असं उत्तर आलं. पण आता पुढे काय? मग मीच शक्कल लढवली आणि तिला विचारलं की, ‘उद्या आहेस ना बसमध्ये?’ परत अर्धा पाऊण तास गेला, काही उत्तर नाही. मी पुन्हा ‘हॅलो’ एवढंच पाठवलं. मग तिनं उत्तर दिलं. ‘हो. तुला काय करायचं आहे. आणि तू उद्यापासून माझ्या स्टॉपला उतरत नको जाऊस.’ हे वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ही तर गेलीच हातातून असं काहीसं वाटू लागलं. मी म्हटलं. ‘अगं, तसं नाही माझे मित्रही तिथं येतात ना म्हणून मी तिथं उतरतो.’ परत अर्धातास सन्नाटा. ‘व्हॉट्स अॅप’च्या स्क्रीनवरून नजरच हटत नव्हती. पांढऱ्या टॉपमध्ये महाविद्यालयाच्या गच्चीवर काढलेला तिचा डीपीचा फोटो पाहून पाहून वेळ घालवला. पण उत्तर येईना. अखेर ते आलं. ‘तरीही तू माझ्यासाठी एक स्टॉप रोज पुढे येतोस आणि मग परत चालत जातोस हे मला आवडत नाही.’ हे वाचून जरा पुन्हा डाळ शिजू लागली असं वाटलं. माझ्या काळजीने ती असं बोलली असणार. मी लगेच फिल्मी उत्तर दिलं ‘अगं, तुझ्यासाठी एक काय सर्वच स्टॉप चालत जायची माझी तयारी आहे.’ त्यावर ती उत्तरली ‘अच्छा, तर मग उद्या चालतच जाऊयात.’ आई शप्पथ यार धम्मालच! तिचा हा मेसेज पाहून अक्षरश: उडी मारून मी आनंद साजरा केला. आणि तिला ताबडतोब ‘६.४५ वाजता बाबाजी चहावाल्याजवळ भेटणार का म्हणून विचारलं.’ उत्तर ‘हो’ येणार अपेक्षितच होतं. आणि तस्सच झालं. बस्स उद्या तिच्याबरोबर व्हॅलेंटाइनचा प्लान डिस्कस करायचा आणि यंदाचा व्हॅलेंटाइन तिच्यासोबतच घालवायचा, असं मनाशी ठरवलं. ‘प्रेम करेन तर तिच्याशीच’ असा मनोमन ठाम निश्चय केला आणि मळलेली जीन्स ओल्या कापडाने पुसून काढायला सुरुवात केली.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल: उत्तर आलं
हुश्श!!! चार दिवसांची धडपड संपत आली असं वाटतंय. ‘व्हॉट्स अॅप’वरच्या मेसेजला ला ‘हू आर यू’ असं प्रश्नवजा उत्तर आलं.
First published on: 13-02-2014 at 12:58 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentin day special response comes