निघोज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे संदीप वराळ विजयी झाले. पाच मते फुटल्याने राष्ट्रवादीची सत्ता तर गेलीच, मात्र पक्ष अल्पमतात आहे. या धक्कादायक निकालामुळे तालुक्यातील मोठय़ा व राजकीयदृष्टय़ा महत्वाच्या ग्रामपंचायतीव काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
अिंडच वर्षांपुर्वी निघोज ग्रामपंचायतीची निवडणूक होउन १७ पैकी १२ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले होते. सुरूवातीला चंद्रकांत लामखडे यांना सरपंच पदाची संधी देण्यात आली. मुदत संपल्यामुळे लामखडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. निवड प्रक्रियेदरम्यान गोंधळ होण्याचा आंदाज आल्याने पारनेर पोलिसांनी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
वराळ यांनी राष्ट्रवादीचे विठ्ठल लंके यांचा तीन मतांनी पराभव केला. वराळ यांना १० व लंके यांना ७ मते मिळाली. तब्बल पाच मते फुटल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते चक्रावून गेले आहेत. ऐन सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला तालुक्यातील या मोठय़ा ग्रांमपंचायतीची सत्ता गमवावी लागली. विशेष म्हणजे मतदानासाठी राष्ट्रवादीचे बाराही सदस्य एकत्रितरीत्या आले होते, त्यातील पाच मते फुटली. वराळ यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात वराळ यांनी चाणाक्षपणे डावपेच टाकून विजयश्रीही खेचून आणत सर्वानाच अश्चर्यचकीत केले. तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.