तब्बल २० उद्योगांना पाणीपुरवठा
वेकोलि, सिमेंट कंपन्या, बिल्ट, तसेच वीज प्रकल्प, अशा जवळपास वीस उद्योगांकडून वर्षांकाठी २०१.५७९ दलघमी पाण्याची उचल होत असल्याने आणि येत्या काही वर्षांत तेवढेच वीज प्रकल्प येत असल्याने वर्धा नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच पध्दतीने पाण्याची उचल होत राहिली, तर वर्धा नदी पूर्णत: नष्ट होईल, असे धोक्याचे संकेत जलसंपदा विभागाने दिले आहेत.
औद्योगिकदृष्टय़ा प्रगतीपथावर असलेल्या या जिल्ह्य़ात वैनगंगा, वर्धा, पैनगंगा, इरई, उमा या पाच महत्वाच्या नद्या आहेत. वैनगंगा ही नदी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ाच्या सीमावर्ती भागातून वाहत असल्याने त्यावर एकही उद्योग अवलंबून नाही. इरई नदीचे पूर्ण पाणी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र व या शहरातील लोकांना पिण्यासाठी वापरण्यात येते, तर सर्वात महत्वाची व मोठी नदी, अशी ओळख असलेल्या वर्धा नदीच्या पाण्यावर जिल्ह्य़ातील जवळपास २० उद्योग जिवंत आहेत. यासोबतच या नदीलगतच्या शेकडो गावांची तहानही तीच भागवते, मात्र या नदीचे अस्तित्वच सध्या धोक्यात आलेले आहे. जिल्ह्य़ातील बहुतांश उद्योग या नदीतून वर्षांकाठी २०१.५७९ दलघमी पाण्याची उचल करत असल्याने येत्या दोन वर्षांत ही नदीच केवळ नकाशावर जिवंत राहील की नाही, इतकी वाईट परिस्थती या भागात आहे.
हजारो एकर शेतजमिनीचे सिंचन याच नदीच्या पाण्यातून होते, मात्र काही वर्षांंपासून या नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. वेकोलिने या नदीचे पात्रच बदलले आहे, तर आज या जिल्ह्य़ातील औष्णिक विद्युत प्रकल्प याच नदीवर उभारण्यात येत आहेत. येत्या काही वर्षांत या जिल्ह्य़ात ५५ औष्णिक वीज प्रकल्प येणार आहेत. त्यात अध्र्यापेक्षा जास्त प्रकल्प याच नदीतून पाण्याची उचल करणार आहेत. त्यामुळे ही भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या वर्धा पॉवर, धारीवाल, आरपीजी ग्रुप यांचे सिंचन विभागाशी पाणी करार झालेले आहेत, तसेच येत्या काही वर्षांत येऊ घातलेल्या उद्योगांचाही समावेश आहे. या उद्योग समुहांकडून १३५.९८ दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केली जात आहे. विशेष म्हणजे, या उद्योगांकडून नदीच्या पात्रात बंधारे बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची तीव्र समस्या भेडसावणार आहे. वर्धा पॉवर ४२.१५ दलघमी पाण्याची उचल करत आहे. त्यापाठोपाठ नागपूर एनर्जी इन्फ्रा लि. ४२ दलघमी, नारंडा येथील मुरली अॅग्रो ४.५६ दलघमी, धारिवाल इन्फ्रा लि. १९.२३ दलघमी, बीएस इस्पात लि. १० दलघमी, शालिवाहन कंस्ट्रक्शन १० दलघमी पाणी वर्धा नदीतून उचलत आहे. धारिवाल इन्फ्रा लि. वर्धा नदीत बंधारा बांधायचा होता, मात्र वेकोलि यासाठी परवानगी देत नाही, असे कारण त्यांनी समोर केले आहे.
या औष्णिक विद्युत प्रकल्पांव्यतिरिक्त वेगवेगळे उद्योग ६२.५९९ दशलक्ष घनमीटर पाणी वर्धा नदीतून दरवर्षी घेत आहेत. यासोबतच वरोरा एमआयडीसी, वरोरा पालिका, अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड सिमेंट, लॉयड मेटल्स, एसीसी, ऑर्डनन्स फॅक्टरी, बाबुलाल आईस फॅक्टरी, वॉशरीजकडून पाण्याची उचल होत आहे. एसीसी, अंबूजा, अल्ट्राटेक व बिल्ट या मोठय़ा उद्योगांकडून पाण्याची सर्वाधिक उचल केली जात आहे. विशेष म्हणजे, बिल्ट उद्योग समूहाकडून जेवढय़ा पाण्याची उचल केली जाते तितकेच दूषित पाणी नदीत सोडण्यात येत असल्याने वध्रेचे संपूर्ण पात्रच दूषित झालेले आहे. वर्धा ते राजूरा पट्टय़ात या नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही, इतकी वाईट अवस्था झालेली आहे. त्यामुळे या भागातील शेतीवरही वाईट परिणाम झाला आहे. एकाच नदीच्या पात्रातून इतक्या मोठय़ा प्रमाणात पाण्याची उचल होत असल्याने कधी काळी उन्हाळ्यातही तुडूंब भरून राहणारी ही नदी दोन वर्षांंपासून सातत्याने कोरडी पडत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर एकेक करून या जिल्ह्य़ातील नद्याच पूर्णत: नामशेष होतील, अशी भीती या भागातील लोक व्यक्त करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2012 रोजी प्रकाशित
वर्धा नदीचे अस्तित्वच नष्ट होण्याचे ‘जलसंपदा’चे संकेत
वेकोलि, सिमेंट कंपन्या, बिल्ट, तसेच वीज प्रकल्प, अशा जवळपास वीस उद्योगांकडून वर्षांकाठी २०१.५७९ दलघमी पाण्याची उचल होत असल्याने आणि येत्या काही वर्षांत तेवढेच वीज प्रकल्प येत असल्याने वर्धा नदीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाच पध्दतीने पाण्याची उचल होत राहिली, तर वर्धा नदी पूर्णत: नष्ट होईल, असे धोक्याचे संकेत जलसंपदा विभागाने दिले आहेत.

First published on: 21-12-2012 at 03:12 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vardha river going to dry says water deparment