वाशीम जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ापासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून जिल्ह्य़ातील कोणत्याही गावामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला नसल्याचे वृत्त आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्य़ातील संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी ४२५ गावांमध्ये १२४९ उपाययोजना प्रस्तावित केल्या असून यासाठी ५ कोटी २ लाख ११ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.
जिल्हा प्रशासनाने १ ऑक्टोबर २०१२ ते ३० जून २०१३ या कालावधीसाठी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यात जिल्ह्य़ातील ५० गावांमध्ये ५१ विंधन विहिरी-कूपनलिका घेण्यासाठी ३० लाख ६० हजार रुपये, ४८ गावातील ४८ नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५१ लाख ५० हजार रुपये, २०८ गावातील ५२७ विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीसाठी ४२ लाख ४८ हजार रुपये, चार गावातील चार तात्पुरती पूरक नळ योजनेसाठी १५ लाख ७५ हजार रुपये, टंचाईग्रस्त ९६ गावांमध्ये ९० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १ कोटी ३० लाख ५० हजार रुपये, ३२९ गावातील ४१९ खाजगी विहिरीचे अधिग्रहण करण्यासाठी १ कोटी १४ लाख ४८ हजार रुपये, ९९ गावातील ११० विहिरी खोल करणे आणि गाळ काढण्यासाठी १६ लाख ८० हजार रुपयांची तरतूद या कृती आराखडय़ामध्ये करण्यात आली आहे.
या आराखडय़ातील मंजुरी मिळालेल्या उपाययोजनांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. यात २० गावातील २१ विंधन विहिरी व कूपनलिका, १२ गावातील १२ नळ योजनांची दुरुस्ती, २०७ गावातील ५२४ विंधन विहिरीची दुरुस्ती, एका गावामध्ये तात्पुरती नळ योजना, तीन गावातील पाच खाजगी विहिरींचे अधिग्रहण या कामांचा समावेश असून या कामासाठी ९२ लाख १२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील अनेक गावांमध्ये दीड महिन्यांपासून पाणी टंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांसह विविध स्त्रोतामधील जलसाठा झपाटय़ाने कमी होत आहे. जिल्ह्य़ातील प्रकल्पांमधील पाण्याचा साठा जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी आरक्षित करण्याची गरज आहे. काही प्रकल्पांवर सध्याही उन्हाळी ओलितासाठी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा वापर होत आहे. संभाव्य पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई केल्यास अनेक टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ येणार नाही, अशा प्रतिक्रियाही ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.                 (समाप्त)