* आडत्यांच्या भूमिकेमुळे सर्वसामान्यांना भरुदड;
* शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणण्याचे बाजार समितीचे आवाहन
आडत सहा टक्के करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात आडत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गुलटेकडी मार्केट यार्ड व शहरात भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर घटल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत. आडत्यांच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक भरुदड सहन करावा लागत आहे. नाशवंत माल विकला जाणार नसल्याच्या भीतीने शेतकऱ्यांकडून भाज्यांची आवक कमी झाली आहे. शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीची व्यवस्था करण्यात आली असल्याने त्यांनी मालाची आवक करावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशवंत मालावर आठ टक्क्य़ांपेक्षाही जास्त आडत घेतली जात असल्याने केवळ सहा टक्केच आडत आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, पुण्याच्या बाजार समितीत आडत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध करून बंदची भूमिका घेतली आहे. सर्वच बाबतीत मोठय़ा प्रमाणावर महागाई झाली असताना, नाशवंत मालावरील आडत वाढली पाहिजे, अशी आडत्यांची मागणी आहे. त्यामुळे शनिवारपासून आडत्यांनी त्यांचे व्यवहार बंद ठेवले आहेत.
आडत्यांनी व्यवहार बंद ठेवल्याने नाशवंत माल बाजारात आणावा की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. माल बाजारात आणल्यास व तो न विकल्यास नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये असल्याने मार्केट यार्ड व महत्त्वाच्या सर्वच बाजारांमधील आवक मोठय़ा प्रमाणावर घटली आहे. परिणामी भाज्यांचे दर मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. काही भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नाहक भरुदड सोसावा लागत आहे.
आडत्यांनी व्यवहार बंद ठेवले असले, तरी बाजार सुरू आहे. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता शेतकऱ्यांनी माल बाजारात आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा माल विकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांवर
दबाव येऊ नये. त्याचप्रमाणे मालाच्या विक्रीत अडथळा होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आवक केवळ १० ते १५ टक्के
गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये भाज्या व फळभाज्याची आवक केवळ १० ते १५ टक्क्य़ांवर आली आहे. फळभाज्याची आवक नेहमी ११ हजार क्विंटलपेक्षा अधिक असते. ही आवक सध्या ३० ते ४० क्विंटलवर आली आहे. पालेभाज्यांची नेहमीची आवक दोन हजारांहून अधिक क्विंटल असते. ही आवक ९०० क्विंटलपर्यंत खाली आली आहे. फळांची आवकही मोठय़ा प्रमाणावर कमी झाली आहे.
भाज्यांचे प्रतिकिलोचे रुपयांमध्ये दर
(कंसात पूर्वीचे दर)
हिरवी मिरची- ७० ते ८० (१८ ते २०)
भेंडी- ५० ते ५५ (२० ते २५)
गवार- ६० ते ६५ (२८ ते ३०)
काकडी- ४२ ते ४४ (१४ ते १६)
घेवडा ७० ते ८० (२५ ते ३०)
वांगी- २४ ते २६ (१६ ते १८)
दुधी भोपळा- ३० ते ३५ (१४ ते १६)
आले ९० ते १०० (५० ते ६०)
मटार- ६० ते ८० (५० ते ६०)
गाजर- ५० ते ६० (२५ ते ३०)
सिमला मिरची- ४५ ते ५० (२० ते २२)