महसूल भरतीतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी तीन दिवसांचा कार्यक्रम घेऊन आलेल्या उपसचिवांनी एकाच दिवसात चौकशीची औपचारिकता पूर्ण करून काढता पाय घेतला. तलाठी व कारकुनांच्या भरतीत अनियमितता झाल्याचे सांगत ही भरती प्रक्रियाच रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी राज्य सरकारकडे केल्यानंर महसूलच्या उपसचिवांना चौकशीसाठी पाठवले होते. वरिष्ठ पातळीवर चौकशीचा उपचार पूर्ण करून भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी व कारकुनांच्या ११८ जागांसाठी भरती प्रक्रिया एप्रिलमध्ये पूर्ण करण्यात आली. परंतु तत्कालिन जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या या भरतीबाबात काही तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर आलेल्या जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी या भरती प्रक्रियेबाबत स्वतंत्र चौकशी करून अहवाल विभागीय आयुक्तांसह सरकारला पाठवला. त्यात भरती प्रक्रियेत अनेक अनियमितता झाल्याने ही प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस केंद्रेकर यांनी केली होती. त्यामुळे या भरती प्रक्रियेत तत्कालिन जिल्हाधिकारी कोचे यांच्यासोबत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही संशय व्यक्त केला जात होता. या पाश्र्वभूमीवर मंत्रालयाने महसूल विभागाचे उपसचिव राजेंद्र बेंगळे यांची चौकशीसाठी नियुक्ती केली. शुक्रवारी तीन दिवसांचा कार्यक्रम घेऊन आलेल्या बेंगळे यांनी दिवसभरात चौकशी पूर्ण करून काढता पाय घेतला. जिल्हाधिकारी केंद्रेकर बाहेरगावी होते. हीच संधी साधण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात झालेली भरती प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर रद्द करायची का, असा प्रश्न मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे उपसचिव राजेंद्र बेंगळे यांना पाठवून प्रत्यक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, बेंगळे यांनी दिवसभराच्या धावत्या दौऱ्यात प्रक्रियेची माहिती समजून घेत सरकारकडे अहवाल देणार असल्याचे सांगितले.