विदर्भातील शेतक री खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून शेतीच्या मशागतीची कामे सुरू करून खते व बियाण्यांसाठी जुळवाजुळव केली जात आहे. कृषी खात्यानेही आढावा बैठक घेऊन खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. ८२ टक्के क्षेत्र कोरडवाहू असल्याने खरीप हंगामावर शेतक ऱ्यांची सारी आशा असते. यावर्षी पाऊस चांगला राहील, असा अंदाज असल्याने शेतक ऱ्यांच्या हंगामाबाबतच्या आशा वाढल्या असून त्याने उत्साहाने कामाला सुरुवात केली आहे.
राज्यात कापूस लागवड क्षेत्र वाढविण्यावर राज्य सरकारचा भर आहे. कृषी खात्याने २०१४-१५ च्या खरीप पिकांच्या नियोजनाचा अलीकडेच घेतलेल्या आढाव्यात यंदा पूर्व विदर्भात ३ लाख २४ हजार ७०० हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१४-१५ करिता विविध उपाययोजनेसाठी नागपूर विभागासाठी पीक कर्जाचा आराखडा ९३३ कोटी रुपयांचा आखण्यात आला आहे. त्यात खरीप हंगामासाठी ७४६ कोटी रुपये तसेच रब्बी हंगामासाठी १८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बियाणांची टंचाई आगामी हंगामात जाणवू नये म्हणून कृषी खात्याकडून ५२५ क्विंटल संकरीत ज्वारी साठा मंजूर झाला आहे. २ हजार ४६९.६ क्विंटल बी.टी. कापसाची मागणी नोंदविण्यात आली आहे. १० हजार सोयाबीन, मूग १५६, मका ७००, उडीद १६८, एरंडी २८, भुईमूग ७५०, तूर २ हजार ८८० व धान २२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. बी.टी. कापसाचा यंदा महाबीजकडून ६९३.४० क्विंटल पुरवठा केला जाणार आहे. त्याबरोबरच धान ३ हजार ३६९, उडीद २२.५४, सोयाबीन २० हजार ३५६.२०, तूर १४५.२०, असे एकूण २४ हजार ५८६.३४ क्विंटल बियाणांचा पुरवठा यंदा केला जाणार असल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे.  
खरीप हंगामात खताची टंचाई जाणवू नये म्हणून कृषी विभागाने रासायनिक खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याची योजना आखली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गावपातळीवर किसान गट तयार करण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रमाणित कृषी गटाला रासायनिक खताची विक्री केली जाणार आहे. तालुका खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे गोदाम बफर स्टॉक पाईंट राहणार आहे. सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी पतपेढय़ा, विविध कार्यकारी संस्था आणि गरज पडली तर सावकारांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना रासायनिक खत आणि बियाणे खरेदी करावी लागणार आहे.
दरम्यान, शेतात पावसाचे पाणी जमिनीत मुरावे म्हणून नांगरणीची कामे सुरू झाली आहेत. जमीन उघडी करून मातीचे थर खालीवर करणे हा नांगरणीचा मुख्य उद्देश आहे. यामुळे आधीच्या पिकांची धसकटे व पालापाचोळा जमिनीत गाडला जातो. पाऊस पडल्यानंतर तो कुजून त्याचे खतात रूपांतर होते. अलीकडील काळात बैलांकडून केली जाणारी नांगरणी शेतक ऱ्यांनी जवळजवळ थांबविली आहे. बैलांच्या नांगरणीला लागणारा वेळ आणि श्रम वाचावे म्हणून आता ट्रॅक्टरनेच नांगरणी होत आहे. साधारण तीनशे ते चारशे रुपये प्रतितास दराने ट्रॅक्टरने नांगरणी केली जात आहे. जमीन भुसभुशीत करण्याचे कामही आता ट्रॅक्टरने केले जात आहे. वखरणी, फणकटणी, पेरणी आणि पुढे पीक काढणी ही कामेसुद्धा शेतकरी यंत्रानेच करू लागले आहेत. ढेकळे फोडणे, जमीन सपाट करणे व वखरणी ही कामे झाल्यानंतर शेणखत टाकण्याचे काम शेतकरी सुरू करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha farmers preparing for kharif season
First published on: 29-05-2014 at 01:22 IST