वादग्रस्त उमेदवार शिवसेनेसाठी मारक

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्ह्यात भाजपपेक्षा शिवसेना अधिक जागा मिळविण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना प्रत्यक्षात भाजपच्या जागांमध्ये तीनने वाढ होत

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्ह्यात भाजपपेक्षा शिवसेना अधिक जागा मिळविण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना प्रत्यक्षात भाजपच्या जागांमध्ये तीनने वाढ होत असताना शिवसेनेला मात्र आपल्या आधीच्या जागांमध्ये एकाचीही भर टाकता आली नाही.  या निकालाने शिवसेनेचे पदाधिकारी चक्रावले असले तरी भाजपला तब्बल चार चागांवर टक्कर देणाऱ्या शिवसेनेने योग्य उमेदवारांची निवड केली असती तर किमान नाशिक पश्चिम, नांदगाव आणि नाशिक पूर्व या तीन जागांची भर त्यांच्या खात्यात होऊ शकली असती, असे आता शिवसैनिकच बोलू लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुकांची भाजप आणि शिवसेनेत प्रवेशासाठी एकच स्पर्धा सुरू झाली. भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठांनीही जे जे येतील त्यांना प्रवेश देण्याचा सपाटा सुरू केला. प्रवेश करणाऱ्यांची पाश्र्वभूमी तपासून पाहण्याची गरजही त्यांना वाटली नाही. तसेच ज्यांनी ही गोष्ट नेत्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर डोळेझाकपणे काही जणांना दिलेली उमेदवारी शिवसेनेसाठी कशी घातक ठरली ते दिसून येते. नाशिक शहरातील याआधी मनसेच्या ताब्यात असलेल्या तीनही जागांवर भाजपने झेंडा फडकविला. त्यातील नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व या दोन जागांसाठी उमेदवारांची निवड करताना शिवसेनेने हुषारी दाखविली असती तर, त्यांना फायदा होण्याची चिन्हे अधिक होती. नाशिक पश्चिम मतदारसंघाचा निकाल संपूर्णपणे सिडकोच्या मतदानावर अवलंबून असतो. सिडकोमध्ये कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) या तालुक्यांमधील रहिवासी बहुसंख्य आहेत. त्यामुळे कसमादे भागातील उमेदवार असल्यास त्याला विजयाची संधी अधिक हे या मतदारसंघातील सोपे गणित. (अपवाद २००९ निवडणुकीतील मनसे लाटेचा) काँग्रेस, राष्ट्रवादीला फारसा थारा न देणारा येथील मतदार आहे. सिडकोतील मतदारांची मानसिकता ओळखत भाजपने कसमादे भागाशी नाते सांगणाऱ्या सीमा हिरे यांना उमेदवारी दिली. तर, शिवसेनेने वादग्रस्त पाश्र्वभूमी असलेले खान्देशातील सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी दिली. महापालिकेतील राजकारणाच्या निमित्ताने बडगुजर हे सतत कोणत्या ना कोणत्या वादात राहिले आहेत. शिवसेनेतंर्गत त्यांच्याविषयी एका गटाची नाराजीही लपून राहिलेली नाही. या सर्व कारणांमुळे शिवसेनेला हक्काची एक जागा गमवावी लागल्याची चर्चा आहे.
नाशिक पूर्व या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भर पावसात झालेली सभा भाजपचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या चांगलीच उपयोगी पडली.
या मतदारसंघातही शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. चंद्रकांत लवटे हे या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार होते. लवटे बंधूंची दादागिरी आणि वादग्रस्त पाश्र्वभूमी शिवसेनेच्या विजयाच्या आड आली. याठिकाणी दत्ता गायकवाड किंवा दुसरा उमेदवार असता तर सानप यांच्यासाठी विजयापर्यंत पोहोचणे अवघड झाले असते. लवटे यांच्या उमेदवारीमुळे अनेक शिवसेनाप्रेमींनीही नाईलाजाने सानप यांना मतदान केल्याचे दिसून येत आहे.
नांदगाव मतदारसंघातही शिवसेनेसाठी स्थिती अनुकूल असल्याचे मानले जात होते. राष्ट्रवादीच्या आमदारांविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा शिवसेनेला मिळणे सहजशक्य होते. परंतु येथेही पोलिसांच्या दप्तरी गुन्ह्यांची नोंद असलेल्या सुहास कांदे या वादग्रस्त व्यक्तीमत्वास शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. त्याविरोधात निष्ठावंत शिवसैनिकांच्या एका गटाने उघड नाराजी व्यक्त करत मेळावाही घेतला. परंतु पक्षाने त्यांची बाजू जाणून घेण्याऐवजी मेळावा घेणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरच कारवाईचे अस्त्र उगारले. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये वेगळाच संदेश गेला. बहुतांशी नाराज शिवसैनिकांनी त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रचार केल्याचे सांगितले जाते. ऐनवेळी अशा प्रकारची रसद मिळाल्यामुळे राष्ट्रवादीविरोधात नाराजी असतानाही पंकज भुजबळ हे विजयी होऊ शकले. नाशिकमधील सिडको भागात वाहन जळीतकांड घडले होते, तेव्हां ज्याच्याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली होती, त्यालाच उमेदवारी देताना शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व या उमेदवाराच्या कोणत्या गुणांवर भाळली, हेच मतदारांना समजेनासे झाले. मतदारांना गृहित धरून राजकारण करण्याच्या शिवसेनेच्या नीतीला या तिघा वादग्रस्त उमेदवारांना घरी बसवून मतदारांनी चपराक दिल्याचे बोलले जात आहे.      

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vidhansabha election result nashik

ताज्या बातम्या