शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाने मुंबईसह राज्यातील बहुतांश शहर व गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने बंद पुकारण्यात आल्याने त्याचा परिणाम विविध व्यवसायांवर झाल्याने कोटय़वधीचे नुकसान झाले. सलग दोन दिवस देशी-विदेशी दारू दुकाने, बियरबार, सट्टापट्टी, चित्रपटगृह व ऑनलाईटन लॉटरी पूर्णत: बंद होती. एकटय़ा विदर्भाचा विचार केला तर नुकसानीचा हा आकडा २०० कोटीच्या घरात आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शनिवारी दुपारी ३.३० वाजता आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकताच मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरे व गावातील बाजारपेठ बंद होती. निधन झाले त्या दिवशी दुपारपासूनच मुंबईतील सर्व व्यवसाय ठप्प झाले. टॅक्सी, सिटीबस पासून तर बियर बार, देशी विदेशी दारूची दुकाने, चित्रपट गृहे, सराफा बाजार व इतर दोन नंबरचे व्यवसाय ठप्प झाले. चित्रपट गृह बंद झाल्याने त्याचा सर्वाधिक फटका यशराज बॅनरच्या ‘जब तक है जान’ व अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटांना बसला. साधारणत: वीक एन्डला सिनेमा बघण्याची फॅशन आहे. मात्र, या दोन दिवसात चित्रपटगृहे बंद असल्याने आणि सर्व चॅनेल्सवर बाळासाहेबांच्या बातम्या सुरू होत्या. त्यामुळे दूरदर्शन तसेच विविध चॅनल्सवरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. याच दोन दिवसात राज्यात प्रथमच सट्टापट्टी बंद होती. त्यासोबतच ऑनलाईन लॉटरीचे काम बंद झाल्याने एका दिवसात किमान २५ कोटीचे नुकसान विदर्भात झाले.
पाठोपाठ सराफा बाजार पूर्णत: बंद होता.  दिवाळीचा सण त्यात पंचमी आल्याने लोक या दिवशी सोन व चांदीची खरेदी मोठय़ा प्रमाणात करतात. व्यापारच ठप्प असल्याने खरेदी झाली नाही. त्याचा परिणाम व्यवसायीकांचे कोटय़ावधीचे नुकसान झाले. दिवाळीच्या दिवसात कापड खरेदी मोठय़ा प्रमाणात होते. त्यालाही याचा फटका बसला आहे. यासोबतच सर्व छोटे मोठे व्यापारही या काळात अक्षरश: बंद होते. विदर्भात बहुतांश शहरात पोलिसांनी स्वत: पुढाकार घेवून देशी विदेशी दारू दुकाने व बियर बार बंद केली. नागपूर व चंद्रपूर या दोन शहरात सर्वाधिक दारू विकल्या जाते. मद्यविक्री बंद असल्याने विक्रेत्यांचे नुकसान झाले. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या शो-रूम, मोटरसायकल व कारच्या शो-रूम बंद होत्या. त्याचाही फटका या व्यवसायिकांना बसलेला आहे. एकटय़ा विदर्भाचा विचार केला तर व्यवसायीकांच्या नुकसानीचा हा आकडा किमान दोनशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्ती घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.