प्रवाशांचे प्रचंड हाल
हजरत निझामुद्दिन-भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस शनिवारी विलंबानेच दिल्लीहून निघाली. वाटेत दाट धुक्यामुळे ही गाडी कासवगतीने पुढे सरकत होती. नागपूरला पोहोचेपर्यंत या गाडीला २२ तासाचा विलंब झाला होता. दिल्लीहून, तसेच उत्तर प्रदेशातून सुटणाऱ्या बहुतांश रेल्वेगाडय़ांना या धुक्याचा फटका बसत आहे. गेल्या आठवडय़ात थंडीचा कडाका वाढला होता. नाताळाच्या सुटीत बाहेरगावी जाणाऱ्या पर्यटकांना थंडीसोबतच रेल्वेगाडय़ांच्या संथगतीचाही सामना करावा लागला. पहाटेच्या धुक्यामुळे इंजिनचालकाला समोरचे काहीच दिसत नसल्याने धुके दूर होईपर्यंत रेल्वेगाडी एखाद्या रेल्वेस्थानकावर अडकून पडते. मुंबई किंवा दक्षिणेतून सुटणाऱ्या रेल्वेगाडय़ा वेळेवर धावत असल्या तरी उत्तर भारत आणि पूर्व भारतातून सुटणाऱ्या रेल्वेगाडय़ांना धुक्याचा मोठा फटका बसला आहे.
 सोमवारी नागपूरला पोहोचणारी नवी दिल्ली-हैदराबाद ए.पी. एक्स्प्रेस ११ तास ३५ मिनिटे उशिरा धावत होती. पाटणा-बंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस ९ तास, तर गोरखपूर-त्रिवेंद्रम राप्तीसागर एक्स्प्रेस ५ तास विलंबाने धावत होती. जम्मू तावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस, पाटणा-सिकंदराबाद एक्स्प्रेस, नवी दिल्ली-चेन्नई जी.टी. एक्स्प्रेस, दरभंगा-हैदराबाद डेक्कन एक्स्प्रेस, जयपूर-चेन्नई एक्स्प्रेस, हजरत निझामुद्दिन-हैदराबाद दक्षिण एक्स्प्रेस, शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल या गाडय़ा देखील १ तांस ते ४ तास विलंबाने धावत होत्या. नवी दिल्ली-त्रिवेंद्रम केरळ एक्स्प्रेसलाही धुक्यामुळे विलंब झाला.  
रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडल्याने पॅसेंजर गाडय़ांच्या धावण्यावरही प्रभाव पडल्याचे दिसून आले आहे. उशिराने धावणाऱ्या एक्स्प्रेस गाडय़ांना पुढे मार्ग देण्यासाठी या पॅसेंजर गाडय़ांना मधल्या स्थानकांवर थांबवून ठेवण्यात येत असल्याने लोकांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.  कडाक्याच्या थंडीत रेल्वेस्थानकांवर गाडय़ांची वाट पाहण्याखेरीज अन्य पर्यायही नसल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. विलंबामुळे तिकिट रद्द करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.
उशिरा धावणाऱ्या गाडय़ा
प्रतिनिधी, नागपूर

उत्तर भारतात धुक्याचे साम्राज्य पसरल्यामुळे विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक अद्यापही सुरळीत झालेले नसून, सोमवारी नागपूरमार्गे जाणाऱ्या आठ गाडय़ा उशिरा धावत होत्या. १२४०६ निझामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस १४ तास, १२७२४  नवी दिल्ली- हैद्राबाद आंध्रप्रदेश एक्सप्रेस १३ तास, १२४०९ रायगड- निझामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस ११ तास, १२८११ लोकमान्य टिळक टर्मिनस- हटिया एक्सप्रेस ७ तास, १२२९६ पाटणा-बंगलोर एक्सप्रेस ८ तास, २२४०४ नवी दिल्ली- पाँडिचेरी एक्सप्रेस २ तास, तर १२८५९ मुंबई- हावडा गीतांजली एक्सप्रेस सव्वा तास उशिराने धावत होत्या. हीच परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.