जिल्ह्यातील संगमनेर व विखे कारखान्याचा अपवाद वगळता अन्य कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील उसाला प्रतिटन दोन हजार रुपयाने पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. विखे कारखान्याने २ हजार २०० रुपये पहिला हप्ता देऊन आघाडी घेतली असून, आता संगमनेरकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील साखर कारखानदारीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीला मानणाऱ्या बहुतेक कारखान्यांनी पहिला हप्ता दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. संजीवनी, अशोक, ज्ञानेश्वर, मुळा, अगस्ती या कारखान्यांनी तसेच कोळपेवाडीने दोन हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला आहे. श्रीगोंदा, कुकडी, तनपुरे, प्रसाद शुगर, वृद्धेश्वर, अंबालिका, गंगामाई यांचा पहिला हप्ता अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु तेदेखील २ हजार रुपये देण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील विखे कारखान्याने मात्र यंदा आघाडी घेतली असून, सर्वाधिक २ हजार २०० रुपये बँक खात्यात वर्ग केले आहे. विखे यांच्यामुळे जिल्ह्यातील अन्य कारखान्यांची गोची झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर कारखान्याने मागील हंगामात सर्वाधिक २ हजार ८०० रुपये भाव दिला होता. त्यांनी चालू हंगामातील पहिला हप्ता अद्याप जाहीर केलेला नाही. त्यांच्या दराकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मंत्र्यांच्या कारखान्यांचा उतारा
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा उतारा यंदा नऊ ते साडेनऊ एवढा आहे. पण विखे व थोरात या दोन मंत्र्यांच्या कारखान्यांचा उतारा हा साडेअकरा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या अंबालिकाचा उताराही साडेअकरा आहे. उतारा वाढविण्यासाठी या कारखान्यांनी काय उपाययोजना केली हे मात्र गुलदस्त्यात आहे.